वर्षभरात ६९.६० टक्क्यांनी वाढली CNG ची किंमत, महागाई लावतेय सामान्यांच्या खिशाला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 08:34 IST2022-05-16T08:28:13+5:302022-05-16T08:34:50+5:30
पेट्रोलियम कंपन्यांनी ३१ दिवसांनंतर सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे.

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel) किंमतीनं उच्चांक गाठला आहे. काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी इंधनाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका आता सामान्यांनाही बसताना दिसतो.
आता सीएनजी (CNG) वाहनं वापरणाऱ्या लोकांच्या खिशावरचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच राजधानीत मालवाहतुकीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या एका वर्षात दिल्लीत सीएनजीच्या किमतीत ६९.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच दैनंदिन कामासाठी आणि कार्यालयात ये-जा करण्यासाठी सीएनजी वाहने वापरणाऱ्या लोकांच्या खिशावरही ताण येत आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी ३१ दिवसांनंतर सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. यानंतर दिल्लीत सीएनजी ७३.६१ रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला आहे. सीएनजीच्या किमती वाढल्याने सीएनजीवर चालणाऱ्या हलक्या व्यावसायिक वाहनांमधून होणारी मालवाहतूकही २० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
महागाईमुळे सर्वच उत्पन्न गटातील लोकांना याचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलसोबतच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीही गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढल्या आहेत. आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं त्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे.
सर्वप्रथम अशा लोकांवर याचा परिणाम होणार आहे, जे आपल्या कामकाजासाठी किंवा कार्यालयांमध्ये जाण्यासाठी सीएनजी वाहनांचा वापर करतात. यानंतर वस्तूंच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दिल्लीत मोठ्या गोदामांपासून दुकानांपर्यंत सामान आणण्यासाठी प्रामुख्यानं सीएनजी वाहनांचा वापर करण्यात येतो.
या वर्षी जवळपास साडेचार महिन्यांमध्ये सीएनजीच्या किंमतीत २०.५७ रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सीएनजी ५३.०४ रुपये प्रति किलोच्या स्तरावर होते. परंतु आता सीएनजीचे दर वाढून ७३.६१ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात यात तब्बल चार वेळा वाढ करण्यात आली आहे.
मार्च महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे. २२ मार्च रोजी पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लिटर होते. परंतु आता दिल्लीत त्याची किंमत १०५.४१ रुपये आणि मुंबईत १२०.५१ रुपयांवर पोहोचली आहे.
डिझेलही ८६.६७ रुपयांवरून वाढून ९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. दोन वर्षांमध्ये पेट्रोलचे दर ३५.८२ रुपये आणि डिझेलचे दर ३४.३८ रुपये प्रति लिटर इतके वाढले आहेत.