शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Success Story: खिशात फक्त ४ रुपये घेऊन आलेले मुंबईत; आज अंबानी, तेंडुलकर, बॉलिवूड सेलिब्रिटी येताहेत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 09:44 IST

1 / 8
Success Story: मुंबईला स्वप्नांची नगरी असं म्हणतात. अनेक जण मुंबईत आपलं नशीब आजमवायला येतात. अशाच एका व्यक्तीच्या यशोगाथेबद्दल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबईतील काळबादेवीच्या गजबजलेल्या अरुंद गल्ल्यांमध्ये 'श्री ठाकर भोजनालय' नावाचे एक रेस्टॉरंट आहे. खवय्यांसाठी, विशेषतः ज्यांना घरगुती चवीची गुजराती थाळी आवडते, त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच आहे.
2 / 8
मगनभाई पुरोहित यांनी १९४५ मध्ये हे कौटुंबिक रेस्टॉरंट सुरू केलं होतं. त्यांच्या निधनानंतर आता मगनभाईंची मुलं गौतम आणि कृष्ण पुरोहित हे भोजनालय चालवतात. उद्योगपती धीरूभाई अंबानी, कोकिलाबेन अंबानी यांच्यापासून ते चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर अशा अनेक नामवंत व्यक्ती येथे येत असतात.
3 / 8
पुरोहित कुटुंब मूळचे राजस्थानचे आहे. मगनभाई जेव्हा आपले गाव सोडून मुंबईत आले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त २ ते ५ रुपये होते. गौतम पुरोहित यांनी 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना आपल्या वडिलांचा हा प्रेरणादायी प्रवास सांगितला.
4 / 8
मगनभाईंनी मुंबईत आल्यावर आयुष्य चालवण्यासाठी सुरुवातीला छोटी-मोठी कामं केली, परंतु महत्त्वाचं म्हणजे त्यांनी महाराजांकडून स्वयंपाकाची कला आत्मसात केली होती. थोडे पैसे जमा केल्यानंतर त्यांनी अखेर 'श्री ठाकर भोजनालय'ची पायाभरणी केली.
5 / 8
मगनभाई पुरोहित यांचा विचार अत्यंत साधा आणि स्पष्ट होता: 'अतिथी देवो भव'. रेस्टॉरंटमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक पोटभर जेवून आणि आनंदानं हसतच बाहेर जावा, अशी त्यांची धारणा होती. याच तत्त्वावर हे भोजनालय आजही उभं आहे, जिथे मिशेलिन-स्टार शेफपासून ते तृप्ती डिमरी सारख्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांची मांदियाळी असते.
6 / 8
गौतम पुरोहित यांच्या मते, या रेस्टॉरंटमध्ये ऋतू आणि वारानुसार पदार्थांमध्ये बदल केला जातो. येथील सर्व कच्चा माल स्थानिक स्रोतांकडून मिळवला जातो. डाळ, शाक (भाजी), रोटली, भात आणि फरसाण अशा प्रत्येक पदार्थात घरगुती चव जाणवते.
7 / 8
येथे सर्व काही ताजं बनवलं जातं आणि अन्नाची नासाडी टाळण्यासाठी गरजेनुसारच प्रमाण राखलं जातं. येथील कर्मचारी नियमित ग्राहकांना ओळखतात, ज्यामुळे मालक आणि ग्राहक यांच्यात एक आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे.
8 / 8
श्री ठाकर भोजनालय गेल्या अनेक वर्षांपासून आपली गुणवत्ता टिकवून आहे. गेल्या वर्षी १९ व्या वेळी या भोजनालयाला 'टाइम्स फूड अँड नाईटलाईफ अवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आले. कढी, उंधियू, खिचडी, रिंगण नू शाक, बटाटा आणि श्रीखंड यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांमुळे हे ठिकाण ग्राहकांना घराची आठवण करून देते.
टॅग्स :businessव्यवसायfoodअन्नMumbaiमुंबई