ती सध्या काय करते! अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या घटस्फोटीत पत्नीने केले एका शिक्षकासोबत लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:56 PM2021-03-08T13:56:44+5:302021-03-08T14:01:51+5:30

Jeff Bezos’ ex-wife has married again following her high-profile divorce from the billionaire Amazon founder. : अॅमेझॉन या जगविख्यात ऑनलाईन ई कॉमर्स कंपनीचे मालक आणि संस्थापक जेफ बेजोस यांचा दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.

अॅमेझॉन या जगविख्यात ऑनलाईन ई कॉमर्स कंपनीचे मालक आणि संस्थापक जेफ बेजोस यांचा दोन वर्षांपूर्वीच घटस्फोट झाला. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.

25 वर्षे एकत्र राहिल्यानंतर जेफ बेजोस यांनी पत्नी मॅकेन्झी बेजोस हिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता. जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांना चार मुले आहेत. मॅकेन्झी बेजोस या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या पहिल्या कर्मचारी होत्या.

जेफ बेजोस यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीची स्थापना 1994 मध्ये केली होती. घटस्फोटानंतर मॅकेन्झी या अब्जाधीश झाल्या होत्या. कारण पोटगीसाठी त्यांना हजारो कोटींची संपत्ती मिळाली होती.

जेफ बेजोस यांचे लॉरेन सांचेज हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. यातूनच जेफ आणि मॅकेन्झी यांचा घटस्फोट झाला होता. लॉरेन सांचेजला जेफ यांनी १६.६ कोटी डॉलर(१२०० कोटी रूपयांपेक्षा अधिक) किंमतीचे लॉस एंजेलिसमध्ये आलिशान घर खरेदी करून दिले होते.

यानंतर मॅकेन्झी बेजोस दुसरे लग्न करणार का याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. प्रसिद्ध अब्जाधिशाची पत्नी राहिल्याने त्यांच्या पुढच्या वैवाहिक आयुष्याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. ती त्यांनी नुकतीच लग्नाची घोषणा करून संपविली आहे.

मॅकेन्झी यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेत शिकविणाऱ्या सायन्सच्या शिक्षकाशी लग्न केले आहे. मॅकेन्झी यांच्या नव्या पतीचे नाव डेन जेवेट असे आहे. मॅकेन्झी या जगातील धनकुबेर महिलांच्या यादीत आहेत. त्यांच्याकडे एकूण 53 अब्जांहून अधिक संपत्ती आहे. त्यांच्या लग्नाचा खुलासा गिविंग प्‍लेज वेबसाइटद्वारे करण्यात आला आहे.

मॅकेन्झी यांनी यानंतर याचा खुलासा केला आहे. डेन एक चांगला व्यक्ती आहे आणि मी त्याच्यासोबत खूश आहे, असे त्या म्हणाल्या. जेफ यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर मॅकेन्झी यांनी आतापर्यंत 1.7 अब्ज डॉलर दान केले आहेत.

पोटगीतून मिळालेल्या पैशांपैकी अधिकाधिक पैसा दान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांनी सध्या दान केलेला पैसा हा महिलांशी संबंधीत संघटना, फूड बँक आणि कृष्णवर्णीय कॉलेजना दिला आहे.

मॅकेन्झी या सध्या जगातील 22 व्या सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर त्यांचे आधीचे पती जेफ बेजोस हे 177 अब्ज डॉलरच्या संपत्तीद्वाके पहिल्या स्थानावर आहेत.

मॅकेन्झी या जेफ यांच्या कंपनीतच काम करत होत्या. तिथेच त्यांचे सूत जुळले होते. यानंतर त्यांनी लग्न केले होते. अॅमेझॉनच्या उभारणीत त्यांचाही महत्वाचा वाटा होता.

साधारण 25 वर्षे संसार केल्यानंतर त्यांनी सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. मुलगी चिनी आहे, तिला त्यांनी दत्तक घेतले आहेत. 2019 मध्ये पहिल्यांदा जेफ बेजोस यांचे लफडे समोर आल्याने जगभरात खळबळ उडाली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English