Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:23 IST2025-12-18T09:01:10+5:302025-12-18T09:23:07+5:30
Big Banks Rate Cut: बँक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँक, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सारख्या प्रमुख बँकांनी त्यांचे कर्ज व्याजदर कमी केले आहेत. विविध बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जांवर ही कपात करण्यात आली आहे.

Big Banks Rate Cut: बँक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँक, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सारख्या प्रमुख बँकांनी त्यांचे कर्ज व्याजदर कमी केले आहेत. विविध बेंचमार्कशी जोडलेल्या कर्जांवर ही कपात करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेनं या महिन्याच्या सुरुवातीला (डिसेंबर २०२५) रेपो दरात ०.२५% कपात केल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयनं रेपो दर ५.५०% वरून ५.२५% पर्यंत कमी केला आहे. केंद्रीय बँकेच्या या निर्णयानंतर, अनेक बँकांनी त्यांच्या रेपो-लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये (आरएलएलआर) कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे अनेक कर्जदारांचे ईएमआय कमी होण्याची अपेक्षा आहे.

कॅनरा बँक - कॅनरा बँकेनं त्यांचा रेपो-लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट (RLLR) ०.२५% ने कमी केला आहे. हा दर आता ८.२५% वरून ८% वर आला आहे. हा नवीन दर १२ डिसेंबर २०२५ पासून लागू झालाय. ही कपात थेट RBI ने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचंच प्रतिबिंब आहे. RLLR शी जोडलेले कर्ज असलेल्या विद्यमान ग्राहकांना लवकरच त्यांच्या EMI मध्ये कपात दिसेल. त्यांच्या कर्ज कराराच्या अटींनुसार कर्जाची मुदत देखील कमी केली जाऊ शकते.

पीएनबी - पंजाब नॅशनल बँकेनं (पीएनबी) त्यांच्या रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) मध्ये कपात करण्याची घोषणा केली. बँकेने हा दर ८.३५% वरून ८.१०% पर्यंत कमी केला आहे. यामध्ये १० बेसिस पॉइंटचा समावेश आहे. हे नवीन दर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू झाले आहेत.

आयओबी - इंडियन ओव्हरसीज बँकेनं (IOB) त्यांचा RLLR ८.१०% पर्यंत सुधारित केला आहे. हा दर १५ डिसेंबर २०२५ पासून लागू झाला आहे. यासह, बँकेचा एक वर्षाचा MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट) आता ८.८०% झाला आहे, तर तीन वर्षांचा MCLR ८.८५% आहे. MCLR हा बँक कर्ज देऊ शकणारा किमान व्याजदर आहे.

एसबीआय - स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) आणि रेपो लिंक्ड कर्ज दर (RLLR) दोन्हीमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर १५ डिसेंबर २०२५ पासून लागू झालाय. SBI चा EBLR ८.१५% अधिक क्रेडिट रिस्क प्रीमियम (CRP) आणि बँक स्प्रेड (BSP) वरून ७.९०% अधिक CRP आणि BSP पर्यंत कमी करण्यात आला आहे.

बीओबी - बँक ऑफ बडोदानं दिलेल्या माहितीनुसार, बँकेचा प्रभावी बीआरएलएलआर (बेंचमार्क रेपो लिंक्ड लेंडिंग रेट) ८.१५% वरून ७.९०% पर्यंत कमी होईल. यामुळे कर्जदारांना त्यांच्या कर्जाच्या व्याजाच्या पेमेंटमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळेल. बँक ऑफ बडोदाचे हे नवीन दर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू करण्यात आलेत.

इंडियन बँक - इंडियन बँकेनं त्यांचा रेपो-लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट (RLLR) ८.२०% वरून ७.९५% पर्यंत कमी केला आहे. हे नवीन दर बँकेच्या मालमत्ता पोर्टफोलिओवर लागू होतील. हे सुधारित व्याजदर ६ डिसेंबर २०२५ पासून लागू झालेत.

बँक ऑफ इंडिया - बँक ऑफ इंडियानेही त्यांचा रेपो आधारित कर्जदर (RBLR) ८.३५% वरून ८.१०% पर्यंत कमी केला आहे. हा बदल ५ डिसेंबर २०२५ पासून लागू झालाय. बीएसई वेबसाइटवरील बँक ऑफ इंडियाच्या सूचनेनुसार, बँकेचा रेपो आधारित कर्जदर (RBLR) ५ डिसेंबर २०२५ पासून तात्काळ प्रभावानं ८.१०% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र - रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर कपातीनंतर बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या किरकोळ कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने गृहकर्जाचे दर ७.३५% वरून ७.१०% पर्यंत कमी केले आहेत. यामुळे कमी ईएमआय असलेल्या गृहखरेदीदारांना फायदा होईल. याव्यतिरिक्त, कार कर्जाचा व्याजदर ७.७०% वरून ७.४५% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे नवीन कर्जदारांना कर्जावर वाहनं खरेदी करणं सोपं झालं आहे. बँकेनं या कर्जांवरील सर्व प्रक्रिया शुल्क देखील माफ केले आहे, ज्यामुळे ग्राहकांचा प्रारंभिक खर्च कमी झाला आहे.

बँकेकडून कर्ज घेतलेल्या किंवा घेण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी ही व्याजदर कपात चांगली बातमी आहे. रेपो दरात कपात केल्याने बँकांच्या कर्जदरांवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे ग्राहकांना फायदा होतो. कमी ईएमआयमुळे मासिक खर्च कमी होतो आणि कर्जाची परतफेड सोपी होते.

















