१३ हजार किलो सोनं आणि ५०० कोटी लाडूंचा रोजचा खप, तरी तिरुपती बालाजी कर्जबाजारी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:42 IST2025-01-09T17:37:07+5:302025-01-09T17:42:24+5:30

भारतातील श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वपरिचित आहेच, पण त्या मंदिराची उत्सवमूर्ती अर्थात तिरुपती बालाजी अंगावर एवढे सोने लेवून, डोक्यावर सोन्याचा कळस उभारून, चांदीचे खांब असून आणि रोजचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असूनही कर्जबाजारीच आहे. त्यांना कर्ज दिले ते धनसंपत्तीचे देव कुबेर यांनी! देव आपले संकट निवारण करतो, पण देवावर आलेले संकट कोणी निवारायचे? या भोळ्या भावनेपोटी अनेक सश्रद्ध भाविक दानधर्माबरोबरच तिरुपती बालाजीच्या नावे केसही दान करतात. जाणून घेऊया त्यामागील आख्यायिका!

कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ आहे, जो देवांचा खजिनदार म्हणून ओळखला जातो. कुबेराकडे एवढी संपत्ती होती की स्वतः भगवान विष्णूंनीही लक्ष्मीशी विवाह करण्यासाठी त्यांच्याकडून कर्ज घेतले. कर्ज घेताना विष्णूनी कलियुगाच्या अखेरीस व्याजासह सर्व कर्ज फेडणार असल्याचे सांगितले होते. या ऋणातून, भगवान विष्णूचे व्यंकटेश रूप आणि देवी लक्ष्मीचे रूप असलेल्या पद्मावती यांचा विवाह झाला. देवावरचे कर्ज फिटावे या श्रद्धेमुळे आजही भक्त विष्णूचा अवतार असलेल्या तिरुपती बालाजीला मोठ्या प्रमाणात सोने अर्पण करतात. चांदी, हिरे, मोती, दागिने अर्पण करतात, जेणेकरून देव ऋणमुक्त होईल. अशी आहे ती आख्यायिका! सद्यस्थितीत या देवस्थानाकडे सुमारे ३ लाख कोटी संपत्ती आहे आणि जंगम मालमत्तेचाही समावेश आहे, तरी अजून काही बालाजीचे कर्ज फिटेना!

भगवान व्यंकटेश्वराने कुबेराकडून राममुद्राच्या नाण्यांमध्ये १४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या संदर्भात भगवान वेंकटेश्वराने कुबेरांना एक वचनपत्र दिले होते, जे भगवान ब्रह्मदेवाने तयार केले. त्याचा उल्लेख तिरुपतीच्या वराहस्वामी पीठात आढळतो. नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार तिरुपती बालाजीची संपत्ती ३ लाख कोटी रुपये आहे, जी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) २.३२ टक्के आहे.

रामायणानुसार, कुबेर यांना त्यांचे वडील ऋषी विश्व यांनी राहण्यासाठी सोन्याची लंका दिली होती. कुबेरदेवांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना मनाच्या गतीने चालणारे पुष्पक विमानही दिले. वडिलांच्या सांगण्यावरून कुबेरांनी आपला भाऊ रावणाला सुवर्ण लंका दिली आणि कैलास पर्वतावर अलकापुरीची स्थापना केली. येथून अलकनंदा नदी उगम पावते असे म्हणतात. म्हणजेच एक सुवर्ण नगरी दान करणारे कुबेर रावणापेक्षा शतपटीने श्रीमंत असणार हे नक्की!

भगवान वेंकटेश्वर हे तिरुपती तिम्मप्पा या नावांनीही ओळखले जातात. तिरुपती देवस्थानमच्या रेकॉर्डनुसार, भगवान बालाजीच्या नावावर अनेक बँकांमध्ये निधी जमा आहेत. कैक किलो सोने ठेवले आहे, जे त्यांना भाविकांकडून दान म्हणून मिळाले आहे. याशिवाय मंदिरातील सर्व देवतांना सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत, ज्यांचे वजन हजारो किलो आहे. तर चांदीचे दागिनेही हजारो किलोचे आहेत.

वास्तविक पाहता हे त्रिभुवनच त्याचे आहे. पण संस्थानाच्या नावे असलेली जमीन पाहता त्यांच्याकडे ६ हजार एकर वनजमीन आहे. ७५ ठिकाणी ७,६३६ एकर रिअल इस्टेट आहेत. एवढेच नाही तर त्यांच्याकडे १,१२६ एकर शेतजमीन आणि ६४०९ एकर बिगरशेती जमीन आहे. आहे. तिरुपतीशी संबंधित देशभरात ५३५ मालमत्ता आणि ७१ मंदिरे आहेत, त्यापैकी १५९ भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यातून वार्षिक ४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय दरवर्षी १,०२१ कोटी रुपये भाविकांकडून देणगी मिळते ती वेगळी!

भारतातील मंदिरांच्या तिजोरीत इतके सोने आहे की ते अमेरिकन सरकारच्या तिजोरीपेक्षा तिप्पट आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, जगन्नाथ मंदिर, वैष्णोदेवी मंदिर आदी मंदिरांमध्ये ४००० टन सोने ठेवले आहे. ही आकडेवारी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची आहे. भारताचा सोन्याचा साठा ८०० टनांहून अधिक असू शकतो. आणि एकूणच भारतीयांकडे २५ हजार टनांहून अधिक सोने जतन केले आहे. सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेल्या अमेरिकेकडे ८,९६५ टन सोने आहे आणि आपल्याकडे जवळपास तिप्पट!

२०२२ ची आकडेवारी देखील दर्शवते की तिरुमला येथील भगवान बालाजीच्या हुंडीचे वार्षिक उत्पन्न १४०० कोटी रुपये आहे. त्याच वेळी, जाहीर झालेल्या अहवालानुसार एकट्या सचिन तेंडुलकरचे वार्षिक उत्पन्न १,३०० कोटी तर विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न १,०० कोटींहून अधिक आहे. म्हणून तर त्यांनाही क्रिकेटचे देव म्हणत असावे का? असो!

तिरुमला येथे दररोज सुमारे 3 लाख लाडू तयार होतात आणि भक्तांना वितरित केले जातात. केवळ लाडूंच्या विक्रीतून ट्रस्टला दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपये मिळतात. तिरुमाला तिरुपती देवस्थान लाडू पोट्टूवर दिवसाला सरासरी ३ लाख लाडू तयार केले जातात. सध्या पोट्टूची दररोज ८ लाख लाडू बनवण्याची क्षमता आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानमने १० जानेवारीला पुत्रदा एकादशीला होणाऱ्या वैकुंठद्वारा दर्शनासाठी १.२ लाख टोकन वाटपाची घोषणा केली होती. ९ केंद्रांवर ९४ काउंटरद्वारे टोकन जारी केले जातील. होते. मात्र, अचानक झालेल्या गर्दीमुळे सारेच विस्कळीत झाले. १.२ लाख टोकन घेण्यासाठी सुमारे ५ लाख लोक जमले होते. त्यात चेंगराचेंगरी झाल्याने उत्सवाला गालबोट लागले.