'जोडवी' हा स्त्रियांचा सौभाग्य अलंकार का मानला जातो? कुमारिकांनी तो का घालू नये, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:31 PM2022-01-19T13:31:17+5:302022-01-19T13:47:18+5:30

सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही कोणताही अलंकार घालतो. पुरुषांनी जिथे नथ, पैंजण, मंगळसूत्र घातले तिथे बायकांची काय कथा? परंतु हे अलंकार केवळ शोभेसाठी नाही तर प्रत्येक अलंकारामागे शास्त्रीय रचना होती. ती लक्षात न घेता स्त्रीवादी भूमिका घेत काही जणींनी त्यावर बहिष्कार घातला तर काही जणींनी आणि जणांनी पुरोगामी म्हणत सगळ्या अलंकारांचा नक्षाच बदलला.

'आपले मराठी अलंकार’ या डॉ. म. वि. सोवनी लिखित पुस्तकात सर्व दागिन्यांची सविस्तर माहिती वाचायला मिळेल. त्यातलाच काही सारांश प्रस्तुत लेखासाठीसुद्धा घेतला आहे. त्या आधारे सौभाग्य अलांकाचा एक भाग म्हणून जोडव्यांचे महत्त्व काय आहे आणि त्याचा स्त्रियांना काय लाभ होतो ते जाणून घेऊ.

जोडवी हा हिंदू स्त्रियांचा सौभाग्यअंलकार आहे. तो केवळ सुवासिनींनी वापरावा असे म्हणतात. या अलंकारामुळे पायाचे सौंदर्य वाढतेच, शिवाय स्त्रियांचे आरोग्य देखील संतुलित राहते. पायांत जोडवी व तत्सम प्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या बाधा होत नाहीत, असे मानले जाते. लहान मुलींना किंवा कुमारिकांना हे त्रास उद्भवण्याची शक्यता नसल्याने त्यांनी जोडवी घालू नये असे सांगितले जाते.

विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहर पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. आता वेगवेगळ्या नक्षी प्रकारात जोडवी आहेत. पूर्वी फक्त एका वेढ्याचे जोडवे असे, पण आता दोन किंवा चार पाच वेढे असलेली जोडवीही वापरतात. त्यानिमित्ताने जाणून घेऊया जोडवी व तत्सम अलंकारांची माहिती.

अनवट हा शब्द उत्तर भारत प्रदेशात प्रचलित आहे. पायाच्या अंगठय़ात चांदीचे जाडजूड व भक्कम कडे बसवलेले असते, त्याला ‘अनवट’ असे नाव आहे. महाराष्ट्रात अनवटप्रमाणेच ‘अनोठ’, ‘आनवटा’, ‘हणवट’ अशी अपभ्रष्ट शब्दरूपेही लोकांच्या बोलण्यात व लिहिण्यात आहेत. ‘अंगुस्ठा’ असाही एक शब्द या दागिन्याला लावला जातो. कन्नड भाषेत यासाठी ‘पोल्हारा’ असे नाव आहे आणि मराठा कालखंडातील सर्व वाङ्मय प्रकारात ‘पोल्हारा’ हा शब्द अनेकदा आढळून येतो.

(विरोल्या, विरवल्या)- जोडवी आणि विरोद्या ही हिंदू स्त्रिया ‘सौभाग्यचिन्हे’ मानतात. त्यापैकी विरोद्या पायाच्या दुसऱ्या बोटात, तर जोडवी ही पायाच्या तिसऱ्या बोटात घालण्याची सर्वसामान्य प्रथा आहे.

गेंद म्हणजे गुच्छ. जोडव्यालाच वरच्या बाजूला दोन-तीन लहान घुंगरे जोडली की त्याला गेंद असे नाव मिळते. या गेंद अलंकारालाच काही ठिकाणी ‘कांदेफुले’ असेही म्हटले जात असल्याचे मला आढळून आले आहे. त्याशिवाय या गेंद अलंकारालाच ‘विंचू’ असेही म्हणण्याची पद्धत काही ठिकाणी दिसून आली. उत्तर भारतात ‘बिच्छु’, ‘बिछवे’ म्हणून असाच एक अलंकार प्रचलित आहे, त्यावरून हे नाव येथे आले असावे असे वाटते.

पायात करंगळीमध्ये घालण्याचा जोडव्यासारखा अलंकार. याला ‘वेढे’ किंवा ‘वेढणी’ असाही शब्द प्रचलित आहे. हल्ली हा अलंकार फारसा आढळत नाही. पण करंगुळय़ा हा शब्द लावणी आणि लोकगीतात अनेकदा आढळला आहे.

माशाच्या रूपाकाराची उठावदार आकृती करून ती जोडव्याच्या वरच्या बाजूने लावली असते. या अलंकाराला मासोळी असे नाव आहे. महाराष्ट्रात नागर स्त्रियांमध्ये कमी परंतु ग्रामीण भागात स्त्रियांच्या बोटांमध्ये हा अलंकार सर्रास आढळतो. मासोळ्या पायाच्या चौथ्या बोटात घालण्याची प्रथा आहे.

पायाच्या मधल्या बोटात घालण्याचे चांदीचे वळे. कधी कधी एकाच बोटात दोन जोडवीही घातलेली दिसतात. त्यातील लहान जोडव्याला खटवे असे म्हटले जाते. लहान मुलींच्या पायाच्या बोटात कसलाही दागिना घालण्याची पद्धत नाही. स्त्रियांच्या पायाच्या बोटांवर पहिला अलंकार चढतो तो जोडवे. पायाच्या मधल्या बोटावर विवाहप्रसंगी वधू जेव्हा गौरीहरा पूजते तेव्हा जोडवी घातली जातात आणि ती आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.