नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय असे वाटू लागेल, तेव्हा या गोष्टी करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:04 PM2021-04-07T12:04:36+5:302021-04-07T12:12:30+5:30

नाते तेव्हा तुटते किंवा दुरावते, जेव्हा नकारात्मक बाजूंवर आपले लक्ष केंद्रित होते. कालपर्यंत जीवश्च कंठश्च वाटणारी व्यक्ती एकएक डोळ्यासमोरही नकोशी वाटू लागते. या गोष्टी एका रात्रीत घडतात का? तर नाही. वाईट गोष्टी एकाशी एक जमा होत जातात आणि त्याचा डोंगर एवढा वाढतो, की पलीकडचे चांगले काही दिसेनासे होते. म्हणून नाते तोडण्याआधी एक क्षण थांबून स्वतःला विचारा, की इतके दिवस आपण हे नाते का जपले? तरीही उत्तर मिळत नसेल, तर हे उपाय करून पहा.

एखाद्यावर दोषारोप करताना आपल्याकडे समोरच्याच्या चुकांची पूर्ण यादीच तयार असते. परंतु म्हणतात ना, कोणतीही व्यक्ती पूर्ण चूक आणि पूर्ण बरोबर असूच शकत नाही. म्हणून काही काळ चुकांची यादी बाजूला ठेवून गुणांवर लक्ष केंद्रित करा आणि चक्क लिहून काढा. एखादी व्यक्ती आवडते तेव्हा आपल्याला फक्त तिचे गुण दिसतात आणि नावडते तेव्हा फक्त दोष! परंतु एखाद्याला आपले मानल्यावर गुण दोषांसह त्या व्यक्तीचा स्वीकार करता यायला हवा.

नात्यामध्ये आपण अपेक्षांचे ओझे समोरच्याच्या खांद्यावर टाकून मोकळे होतो. जोवर आपल्या मनासारखे घडते तोवर व्यक्ती चांगली आणि मनाविरुद्ध वागले की व्यक्ती वाईट, असे ठरवून टाकतो. परंतु, अनेकदा प्रत्येकाच्या हातून कळत नकळत चुका घडतात. त्यावर अबोला धरून नाते संपुष्टात आणणे योग्य नाही. चुका समोरच्याकडून घडतात, तशा आपल्याही हातून घडतात. हे मान्य केले की दुसऱ्याचे दोषही आपल्याला सहज स्वीकारता येतात.

जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा सगळ्याच नात्यांवरून विश्वास उडून जातो आणि आपण एकटं राहणं पसंत करू लागतो. परंतु, स्वतःच्या कोषात आपण फार काळ राहू शकत नाही. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याला सुख दुःखाला वाटेकरी हा लागतोच. यासाठी दर वेळी नवीन नाते निवडून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा आहे त्या नात्याशी जुळवून घ्यायला शिका. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, समोरचा दोन पावले नक्की पुढे येईल. सुरुवात तुमच्यापासून करा.

आपण अनेकदा समोरच्याला गृहीत धरतो. त्याने आपल्या मनातले समजून घ्यावे, अशी आपली वेडी अपेक्षा असते. तसे होतेही, परंतु नात्यात ती अवस्था येण्यासाठी बराच काळ, बराच सहवास व्हावा लागतो. दोन चार महिन्यात किंवा वर्षात जुळलेले नाते आपल्याला समजून घेईल ही अपेक्षा चुकीची आहे. तसे ऋणानुबंध जुळेपर्यंत संवादात मोकळेपणा ठेवा. दोष, चुका दाखवून दिल्या तर लक्षात येतात आणि सुधारता येतात. दोष दूर झाले की नात्यात पारदर्शकता येते आणि शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले अशी अवस्था नक्की येते.