उंबरठ्यावर शिंकू नये, रात्री कचरा बाहेर टाकू नये, इ गोष्टींमागचे लॉजिक काय? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:48 IST2021-12-18T17:38:41+5:302021-12-18T17:48:07+5:30
प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते. ते कारण समजून घेणारे लोक प्रत्येक कृतीचा तात्विकदृष्ट्या विचार करतात. तर ज्यांना काहीही समजून उमजून न घेता कृती करायची सवय असते, ते लोक छोट्या छोट्या कृतींना 'शास्त्राचे लेबल' चिकटवून मोकळे होतात. परंतु, तसे करणे योग्य नाही. कारण, आजवर आपल्याला पडले नाहीत, तेवढे प्रश्न आताची पीढी बालवयातच आपल्यापुढे ठेवते. त्यांना केवळ `शास्त्र असतं ते!' असे सांगून समाधान होणार नाही, तर आपल्याला त्याची उकलही करून सांगता यायला हवी. त्यासाठी जाणून घेऊया काही सोप्या गोष्टींचा मतीतार्थ!

रात्री केरकचरा बाहेर टाकू नये!
कारण, मौल्यवान वस्तू केरातून जाण्याची शक्यता असते.
उंबरठ्यावर तसेच उंच जागेवर बसून शिंकू नये!
कारण, कलंडून झोक जाण्याची व पडून मार लागण्याची शक्यता असते.
मीठ, कात, चुना एकमेकांनी हातावर देऊ नये!
कारण, त्यांच्या संपर्काचे रासायनिक दुष्परिणाम होऊ शकतात.
रात्री हिंग, मीठ, बिबा, चुना, उडीद विकत आणू नये!
कारण, या गोष्टींचा वापर तांत्रिक लोक अंधश्रद्धा पसरवण्यासाठी करतात. तुमच्या बाबतीत कोणाचा गैरसमज होऊ शकतो.
परगावी प्रस्थान करताना बांधाबांध केलेल्या सामानावर बसू नये!
कारण, तसे केल्यास आतील सामानाची मोडतोड तर होतेच व लहानग्यांना मार आणि मोठ्यांची चिडचिड होते.
वेगवेगळ्या ठिकाणी जायचे असल्यास घरातील सर्वांनी एकाचवेळी बाहेर पडू नये.
कारण, पूर्वी मोबाईलची सुविधा नव्हती. काही निरोप द्यायचे असल्यास किंवा काही सामान विसरल्यास संबंधित व्यक्तीला घरी परतणे अवघड होते.
निरोप घेताना 'जातो' ऐवजी 'येतो' म्हणावे.
कारण, त्यातून त्या स्थानात पुनरागमन सूचित होते. मात्र अपवाद म्हणजे रुग्णालय, कारागृह आणि स्मशान!
जेवताना हातवारे करू नये.
कारण, जेवताना आपल्या बोटाला लागलेली शिते दुसऱ्याच्या अंगावर किंवा ताटात उडतात.