Shattila Ekadashi 2025: षटतिला एकादशीला 'या' वस्तूंचे दान करेल तुम्हाला धनवान; लक्ष्मीविष्णू कृपेची सुवर्णसंधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:12 IST2025-01-25T12:09:52+5:302025-01-25T12:12:27+5:30
Shattila Ekadashi 2025: आज २५ जानेवारी, षटतिला एकादशी व्रताच्या निमित्ताने भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी काही विशेष गोष्टींचे दान करावे असे शास्त्र सांगते. यामुळे जीवनात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि आर्थिक लाभ होतो. हिंदू धर्मात दानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सणवार उत्सवाचे निमित्त योजले आहे. पुण्यसंचय व्हावा असे वाटत असेल तर त्यासाठी दुसऱ्याला देण्याची तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंद देता तेव्हा तुम्हालाही आनंद मिळतो. आपली ओंजळ भरली की त्यातून सांडण्याआधी दुसऱ्याला द्यायला शिका, ही त्यामागची मुख्य शिकवण आहे. ही परिस्थिती आणि मनस्थिती तयार झाली की लक्ष्मी आणि विष्णू कृपा होते.

पौष मास आणि मकर संक्रमण काळात आलेली षटतिला एकादशी महत्त्वाची मानली जाते. थंडीच्या मोसमात आपण उबदार पांघरुणात असताना इतर अनेक जीव अन्न, वस्त्र, निवारा या अभावी कुडकुडत असतात. ते समाज भान ठेवून षटतिला एकादशीच्या औचित्याने अशा गरजू लोकांना दानधर्म केला असता पुण्य लाभते असा शास्त्र संकेत आहे. दान कशाचे करावे? चला जाणून घेऊ.
काळे तीळ :
संक्रांत काळात हळदी कुंकू समारंभात तीळ गूळ दिला जातो. त्याबरोबरच काळ्या तिळालाही आरोग्य शास्त्रात अधिक महत्त्व आहे. त्यामुळे तिळाचे दान केवळ आपापसात न करता गरजवंतानाही या काळात तिळाचे दान करावे. तीळ हा स्निग्धजन्य पदार्थ असल्याने त्याच्या सेवनाने शरीराला उब मिळते. गरजू लोकांना तीळ पोळी, गूळ पोळी, तिळाचे लाडू, चटणी, गजक असे पदार्थ दिले तर त्यांचाही सण साजरा होईल आणि त्यांच्या शुभेच्छा तुमच्या खात्यात पुण्यसंचय करतील. तुमच्या घरात धन-धान्याची उणीव भासणार नाही.
उबदार वस्त्राचे दान :
जानेवारी सुरु होताच थंडी जास्त वाढते आणि मार्च मध्ये होळी येईपर्यंत कमी जास्त होत राहते. अशा स्थितीत आपण स्वतःला शाल, मफलर, कानटोपी, स्वेटर घालून सुरक्षित ठेवू शकतो, मात्र परिस्थितीमुळे रस्त्यावर राहणारे लोक तसेच श्वान, मांजर या जीवांनाही उबदार कपड्याची गरज भासते. अशा वेळी प्राण्यांसाठी गोणपाट, चादर, सतरंजी अंथरून ठेवावी आणि गोर गरिबांना शाल तथा इतर उपयोगी उबदार कपड्यांचे दान करावे.
गुळाचे दान :
गुळाचा संबंध सूर्य आणि मंगळाशी आहे. जर तुम्हाला जीवनात प्रगती हवी असेल तर षटतिला एकादशीला गुळाचे दान करावे. गुळाचे दान केल्याने देवी लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते. गूळ जसा आपल्या आयुष्यात गोडवा आणतो त्याप्रमाणे गरजू घरांमध्येही गुळाची ढेप दिल्यामुळे त्यांचाही सण साजरा होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी हात आखडता न घेता तीळ-गुळाचे तसेच यथाशक्ती पैशांचे दान करा आणि पुण्य मिळवा.
अन्नदान
आपले पोट भरले म्हणून उरलेले अन्न दुसऱ्याला कोणीही देईल, मात्र आपला एकादशीचा उपास असताना दुसऱ्याला अन्न देण्याचा संस्कार आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातला आहे. म्हणून षटतिला एकादशीच्या निमित्ताने गोरगरिबाला कदान्न म्हणजेच कच्चे अन्न वा शिधा द्यावा किंवा अन्नपूर्णेसारखी तयार थाळी जेवायला द्यावी. सद्यस्थितीत अन्नदानाची अनेक कुटुंबांना गरज आहे, पैकी एका कुटुंबाला जरी आपला हातभार लागला तरी हे देवकार्य आपल्या हातून झाले असे समजा.