Ram Navami 2024: रामायणातील 'या' पाच व्यक्तिमत्त्वांकडून मिळालेली शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:04 AM2024-04-15T11:04:42+5:302024-04-15T11:22:43+5:30

Ram Navami 2024: कसे वागावे हे रामायणातून शिकावे आणि कसे वागू नये हे महाभारतातून शिकावे असे म्हणतात! आपले संघर्षमयी आयुष्य पाहता आपण सगळे रोजच महाभारत अनुभवत आहोत. अशातच आदर्श जीवनशैलीचा वस्तुपाठ मिळावा म्हणून आपण रामायणाचे चिंतन करतो. १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यानिमित्त रामायणातील मुख्य पाच व्यक्तिमत्त्वांचा आदर्श इथे वाचकांसमोर ठेवत आहे.

राजा दशरथ: वृद्धत्वाकडे झुकल्यावर राजा दशरथाने स्वेच्छानिवृत्ती पत्करून राज्यकारभार श्रीरामांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. पदाचा, सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. परंतु दुसऱ्याने जाणीव करून देण्याआधी आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होणे आणि पदाचा मोह त्यागणे गरजेचे आहे.

प्रभू श्रीराम : अयोध्येचा राजा म्हणून राजपदाची शपथ घेणार तेवढ्यात वार्ता येते वनवासाची! काय असेल तो प्रसंग, कसा असेल तो क्षण, कशी असेल रामाची मानसिक स्थिती? अन्य कोणी असते, तर त्याला हा धक्का सहन झाला नसता, परंतु रामांनी पितावचनाचे पालन केले आणि आनंदाने वनवासदेखील पत्करला. अशा या दशरथपुत्र श्रीरामाचे नाम घेणे केव्हाही चांगलेच, परंतु त्यांचे गुण अंगिकारणे त्याहून चांगले. श्रीरामांच्या चरणांचा ध्यास आपल्याला मंदिरापर्यंत नेईल, परंतु आचरणाचा ध्यास श्रीरामांपर्यंत नेईल!

माता सीता : वनवासात जाण्याची शिक्षा फक्त रामाला मिळाली होती. परंतु पत्नीधर्म म्हणून सीतेने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी तिला विरोध केला. खुद्द रामांनीसुद्धा तिला नाही म्हटले, परंतु सीतेने राजसुखाचा त्याग करून पतीला साथ द्यायची ठरवली. यातून आपल्याला शिकवण मिळते, की कितीही मोठे संकट आले, तरी ही नियतीची योजना आहे असे मानून तिचा स्वीकार करा आणि आपल्या तत्त्वाला तिलांजली न देता सुखदु:खात आपल्या माणसांची साथ द्या. या निर्णयामुळे सीतेला अनेक कष्ट सहन करावे लागले, परंतु तिच्या त्यागामुळेच ती माता सीता म्हणून गौरवली गेली.

भरत : लक्ष्मण रामाच्या सावलीप्रमाणे सर्वत्र वावरत असला, तरीदेखील बंधू प्रेमाबाबत राम भरताच्या प्रेमाचे दाखले दिले जातात. रामाला वनवास मिळाला, हे कळताच आजोळी गेलेला भरत रामाच्या भेटीला चित्रकुट पर्वतावर येऊन पोहोचतो आणि राज्यकारभार तुम्ही स्वीकारा अशी विनवणी करतो. राम पितृआज्ञेबाहेर नसतात. ते भरताला वडिलांची आणि आईची ईच्छा आणि कर्तव्य पूर्ण कर सांगतात. तेव्हा भरत श्रीरामांच्या पादुका राज्यसिंहासनावर ठेवून राज्यकारभार पाहतो आणि राम परत येईपर्यंत आपणही राज्याबाहेर छोटीशी कुटी बांधून वनवासी जीवन व्यतीत करतो. यावरून शिकवण मिळते, जी गोष्ट आपली नाही, त्यावर अधिकार दाखवू नका आणि ती ज्याची आहे त्याला आदराने सुपूर्द करा.

लक्ष्मण : लक्ष्मणाने रामाला सदैव साथ दिली, तरी रामाचे भरतावर अधिक प्रेम होते. परंतु म्हणून लक्ष्मणाने कधीच वाईट वाटून घेतले नाही. तो आपले कर्तव्य निभावत राहिला. म्हणून त्याच्याकडून आपण शिकले पाहिजे, की नाव व्हावे म्हणून काम करू नये, तर काम करत राहावे, आपोआप नाम होते. निष्काम मनाने केलेली सेवा ईश्वरचरणी रुजू होते. म्हणतात ना...जिनके मन कपट, दंभ नही, हो माया, उनके हृदय बसहु रघुराया!