फुटबॉलचे मूळ महाभारतात सापडते, तर बुद्धीबळाचे रामायणात; वाचा प्राचीन भारतीय खेळांची माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 02:24 PM2021-07-16T14:24:51+5:302021-07-16T14:35:06+5:30

असे अनेक खेळ आहेत, ज्या खेळांचा जन्मदाता भारत आहे. एवढेच नाही, तर त्या खेळांचा संबंध थेट पौराणिक कथांशी आहे. परंतु आपल्यालाच त्याची पुरेशी माहिती नाही आणि असे खेळ आज जागतिक स्तरावर ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले जातात. चला आपल्या संस्कृतीशी आणि पुरातन खेळांची ओळख करून घेऊया.

पौराणिक कथांनुसार रावणाची पत्नी मंदोदरी हिने बुद्धीबळाचा खेळ विकसित केला होता. बुद्धीमान रावणाने आपला सगळा वेळ युद्धात आणि कटकारस्थानांमध्ये वाया घालवू नये, म्हणून तिने हा खेळ बनवून घेतला होता. एका पौराणिक मतानुसार रावणाचा पूत्र मेघनाद याच्या पत्नीने या खेळाची रचना केली होती. एकूणच बुद्धी आणि बळ यांचा संगम असलेल्या रावणाच्या कुटुंबियांनी बुद्धीबळ खेळाची निर्मिती केली असावी, असे म्हणता येईल. या खेळाचे पौराणिक नाव चतुरंगिनी होते, फारसी भाषेच्या प्रभावामुळे त्याला पुढे शतरंज आणि प्राकृत मराठी भाषेत बुद्धीबळ अशी ओळख मिळाली. सहाव्या शतकानंतर या खेळाला जास्त लोकप्रियता मिळत गेली.

हा खेळ भारतातच जन्माला आला, याबाबतीत तुमचेही दुमत नसेल. बालपणापासून आपण अर्जुन, एकलव्य, द्रोणाचार्य यांच्या कथा ऐकत आलो आहोत. परंतु त्याही आधीपासून हा खेळ भारतात आहे. परंतु भारतातून बाहेर लोकप्रिय झालेल्या या खेळाला चीन येथे मान्यता मिळून तेथील गुरुकुलात याच्या स्पर्धा घेतल्या जात असत. त्यावरून कलाजगतात चीन हा धनुर्विद्येचा जन्मदाता समजला जाऊ लागला.

नाव वाचून आश्चर्य वाटले असेल ना? पण हो! हा खेळही भारतीय आहे. वास्तविक पाहता आज हा खेळ ब्राजील, स्पेन, अर्जेंटिना या देशांची ओळख आहे. पण या खेळाचे मूळ भारतात आहे. काही जण म्हणतात, ग्रीक, चीन, इटली हे देश या खेळाचे जन्मदाते आहेत पण तसे नाही. याचा सगळ्यात प्राचीन उल्लेख महाभारतात आहे. श्रीकृष्ण बालपणी आपल्या सवंगड्यांबरोबर यमुनेच्या काठी हा खेळ नेहमीच खेळत असे.

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. दोन हजार वर्षांपूर्वी या खेळाचा उगम इराण येथे झाला. परंतु, त्याकाळात इराण हा भारताचा आर्यव्याप्त प्रदेश असल्यामुळे तो भारताचाच एक भाग होता. पुढे तो विभक्त झाल्यामुळे हा खेळ इराकची ओळख म्हटला जाऊ लागला.

हा अतिप्राचीन खेळ आहे. याचा उल्लेख रामायण, महाभारतातही मिळतो. विशेषत: भीम हा खेळ खेळण्यात निपुण असल्याचे आपणही वाचले आहे. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे स्वरूप वेगळे असले, तरी मूळ कुस्ती या खेळात आहे.

कराटे खेळासाठी आज चीनला आदर्श मानले जाते. परंतु या खेळाचा निर्माता अन्य कोणी नसून भगवान श्रीकृष्ण आहे.कराटे या खेळाचे भारतीय रूप कलारिपट्टू असे आहे. कृष्णाने चाणूर, मुष्टीक, कालिया अशा राक्षसांना हाताच्या प्रहारांनी लोळवले होते. अगस्त्य ऋषींनी या खेळाचा प्रचार प्रसार केला. दुदैवाने आज या खेळाची मूळ ओळख पुसली जाऊन कराटे, जुडो, तायकांडो अशी ओळख मिळाली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतला हा खेळ देखील थेट ऋग्वेदात आढळतो. प्राचीन ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन लोक उत्सवाच्या निमित्ताने समुद्री खेळांसाठी नौकायनाच्या स्पर्धा आयोजित करत असत. आता त्या खेळाला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे.

घोड्यावरून खेळला जाणारा पोलो हा खेळ भारतात प्राचीन काळात राजामहाराजा खेळत असत. त्यांचे अनुकरण करत हा खेळ गावातील मुले, मोठी माणसे विरंगुळा म्हणून खेळू लागली. चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार हा खेळ खेळत असत. त्यांना पाहून ब्रिटीशांनी हा खेळ शिकून घेतला आणि त्यात आपल्या सोयीने नवीन नियमावली बनवून या खेळाचा प्रसार केला. सगोल कंगजेट नावाचा हा खेळ ब्रिटिशांपासून पोलो नावाने ओळखला जाऊ लागला. पण मूळचा तो भारतीयच! याशिवायही अनेक खेळ आहेत, जे भारतात उगम पावले आणि जगभर खेळले गेले. जसे की तलवारबाजी, गंजिफा (पत्ते), गोळा फेक, पतंगबाजी इ. या सर्व गोष्टींचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. त्याचा सविस्तर अभ्यास करून त्यांची ओळख करून घेतली, तर आपल्यालाही आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल आदर दुणावेल.