Mahashivratri, Preah Vihar: या शिव मंदिरासाठी दोन देशांत झाली होती लढाई, अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:28 AM2022-03-01T10:28:24+5:302022-03-01T11:27:15+5:30

Mahashivratri: Preah Vihar हे शिवमंदिर आग्नेय आशियात असून, त्या शिवमंदिरासाठी कंबोडिया आणि थायलंड हे देश आमने-सामने आले होते. हा संघर्ष एवढा तीव्र झाला होता की, त्यासाठी अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली.

आज महाशिवरात्री आहे. देशभरात महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाची भीती आणि निर्बंध बऱ्यापैकी हटल्याने मंदिरांमध्ये गर्दी होत आहे. दरम्यान, शंकर हे दैवत आणि शिवमंदिरं भारतातंच नाहीत तर जगातील अनेक देशांमध्ये आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा शिव मंदिराची माहिती देणार आहोत, ज्याला आपल्या सीमेमध्ये ठेवण्यासाठी दोन देश आमने सामने आले होते.

हे शिवमंदिर आग्नेय आशियात असून, त्या शिवमंदिरासाठी कंबोडिया आणि थायलंड हे देश आमने-सामने आले होते. हा संघर्ष एवढा तीव्र झाला होता की, त्यासाठी अखेर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर या खटल्याचा काय निकाल आला आणि ते मंदिर कुणाला मिळाले याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

हे मंदिर डांगरेक पर्वतमालेमध्ये आहे. ते मंदिर खामेर वंशाच्या राजांनी बांधले होते. प्रीह विहार नावाटं हे शिवमंदिर सहाव्या शतकामध्ये डांगरेक पर्वतमालेमध्ये खामेर राजांनी बांधले होते. ही पर्वतमाला ही कंबोडिया आणि थायलंडमधील नैसर्गिक सीमा मानली जाते. प्राचीन आणि मध्ययुगात मंदिरावरून कुठलाही वाद नव्हता. मात्र आधुनिक काळात नव्याने सीमारेषा आखल्या गेल्यानंतर वादाला तोंड फुटले.

याचं कारण म्हणजे बरीच वर्षे लोकांना या मंदिराचा विसर पडला होता. येथील पर्वतमालेमध्ये हे मंदिर अस्तित्वात आहे, य़ाची माहिती नव्हती. दुर्गम मार्ग असल्याने फारच कमी लोकांना मंदिराची माहिती होती. दरम्यान, १९ व्या शतकाच्या अखेरीस हे मंदिर एका विदेशी नागरिकाने पुन्हा शोधून काढले. त्यानंतर भावनात्मक कारणांमुळे थायलंड आणि कंबोडिया यांच्यात वाद सुरू झाला.

१९०४ मध्ये सियाम (थायलंड) आणि फ्रेंचशासित कंबोडियाने एकत्र येऊन संयुक्त कमिशन तयार केले होते. त्यात दोन्ही देशातील डांगरेक पर्वतामधील सीमा निर्धारित करायची होती. त्यात फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी असा नकाशा तयार केला की, त्यात प्रीह विहार मंदिरातील सर्व मंदिर कंबोडियामध्ये गेली. तर थायलंडला काहीच मिळाले नाही. त्यानंतर वादाला सुरुवात झाली.

दरम्यान, १९५४ मध्ये कंबोडियातून फ्रान्स माघारी परतल्यावर थायलंडने हल्ला करून मंदिरांवर कबाजा केला आणि ती ताब्यात घेतली. त्यानंतर नव्याने स्वतंत्र झालेल्या कंबोडियाने विरोध करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. दोन्ही देशांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला. तसेच त्यांच्यातील राजकीय संबंध बिघडले.

आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये सुनावणी झाली तेव्हा कोर्टाने मंदिराच्या सांस्कृतिक वारशाची चर्चा केली नाही. तर १९०७ मध्ये सीमा निर्धारीत झाल्यानंतर ती थायलंड बरीच वर्षे मान्य करत होता. मग एकाएकी या हल्ल्याची गरज का होती असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला.

या खटल्यात थायलंडकडून माजी ब्रिटीश अॅटॉर्नी जनरल सर फ्रँक सोसकिके आणि कंबोडियाकडून अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री डीन ऐकेसन वकील होते. अखेर प्रदीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर १९६२ मध्ये या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निर्णय दिला. हा निकाला कंबोडियाच्या बाजूने लागला. तसेच थायलंडने लुटलेली संपत्ती कंबोडियाला परत करावी, असे आदेशही देण्यात आले.

या मंदिराच्या नावाने कंबोडियातील प्रीह विहार या प्रांताचे नाव आहे. मंदिर थायलंडपासून जवळ असले तरी थाई लोकांना या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी कंबोडियाचा व्हिसा घ्यावा लागतो. ७ जुलै २००८ रोजी या मंदिराचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला. तसेच हे मंजिर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट करण्यात आले.