शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Diwali 2023: दिवाळीच्या निमित्ताने घरातील देवाचे फोटो, मूर्ती काढणार असाल तर 'असे' विघटन करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:48 PM

1 / 5
जुने फोटो, भग्न मूर्ती वाहत्या पाण्यात सोडून देणे सर्वार्थाने उचित ठरते. कारण, त्या गोष्टी प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. म्हणून साचलेल्या पाण्यात, डबक्यात अशा गोष्टी टाकू नये. तसेच अनेक लोकांना वाहत्या पाण्यात निर्माल्य टाकण्याची सवय असते. मात्र, निर्माल्यामुळे पाणी दुषित होते. हारातील धागे दोरे पाण्यातील जीवांसाठी घातक ठरतात. निर्माल्य बागेतील झाडांना खत म्हणून पुनर्वापरात आणता येते. तसे केल्याने पाप लागत नाही, उलट पर्यावरणाचे संरक्षण होते.
2 / 5
मातीच्या भग्न जुन्या मूर्ती जमीनित पुरल्यामुळे कालांतराने त्या मातीशी एकरूप होतात. अशा मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यांवर श्रद्धेने हळद कुंकू अक्षता वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती घेताना त्या जाणीवपूर्वक माती, दगड, वाळूपासून बनवलेल्या विकत घ्याव्यात. अशा मूर्ती विसर्जित करताना निसर्गाशी सहज एकरूप होतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीत किंवा समुद्रात सोडून न देता त्यांना जाळण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु तसे करतानाही श्रद्धापूर्वक मूर्तीला निरोप द्यावा.
3 / 5
कागदी फोटो किंवा शाडूच्य मूर्ती असतील तर त्या एका बादलीत पाणी भरून त्यात विरघळू द्या. त्याचा लगदा तयार झाला की तो लगदा वापरून एखादे झाड लावा. फोटो फ्रेम असतील, तर काळजीपूर्वक फोटो फ्रेममधून बाहेर काढून घ्या. फ्रेम तुटलेली असेल, तर ती टाकून देता येईल व फोटो पाण्यात विरघळून किंवा झाडाच्या मातीत मिसळता येईल. हाच नियम जुन्या पोथ्यांच्या बाबतीत वापरता येईल. वाहत्या पाण्यात पोथी विसर्जित करता येईल.
4 / 5
हा उपाय शास्त्राने सुचवलेला नसून, हा पर्याय आपणच आपल्या जबाबदारीने निवडला पाहिजे. देवीदेवतांच्या मूर्ती विकत घेताना किंवा भेट म्हणून मिळतात तेव्हा छान दिसतात, परंतु त्या जुन्या झाल्यावर, त्यांचे रंग उडू लागल्यावर त्या विद्रुप दिसू लागतात. म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक ती प्रदुषणमुक्त आहे की नाही, हे तपासून घ्यावे आणि मूर्ती दीड ते दोन इंचापेक्षा मोठी नाही, हे पहावे. मूर्तींची निर्मिती मुख्यत्वे मंदिरासाठी केली जाते. त्या शोभेची वस्तू नाहीत, याचे भान आणि मान आपणच ठेवला पाहिजे.
5 / 5
नाशिकच्या ऍडव्होकेट तृप्ती गायकवाड यांनी 'संपुर्णम' या संस्थेअंतर्गत देवांचे फोटो, मूर्ती यांची योग्य विल्हेवाट करता यावी यासाठी पुढाकार घेतला. २०१९ मध्ये त्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. पुरात वाहून आलेल्या मूर्ती, तसबिरी यांचे एकत्रीकरण करून त्याची उत्तरपूजा करून, त्यांचे रीतसर विघटन केले आपल्या देवीदेवतांना योग्य पद्धतीने निरोप देता यावा म्हणून त्यांनी या सेवाभावी संस्थेची सुरुवात केली. देशभरातून १०० स्वयंसेवक त्यांच्या कार्याशी जोडले गेले आहेत व आजवर जवळपास ५० टन हुन अधिक मूर्ती, फोटोचे रीतसर विघटन झाले आहे. (संपर्क : ९६८९९३१६५६) जर तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसेल तर त्यांचा आदर्श ठेवून आपण आपल्या परिसरात असे संकलन करून वर दिलेल्या पद्धतीनुसार विघटन केले पाहिजे.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Vastu shastraवास्तुशास्त्र