चाणक्यनीति सांगते 'या' चार बाबतीत महिला असतात पुरुषांपेक्षा सरस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:01 IST2021-08-26T12:55:54+5:302021-08-26T13:01:15+5:30
स्त्रियांना अबला असे म्हणतात. काही जण अबला या शब्दाचा अर्थ कमकुवत असा घेतील, परंतु स्त्रियांमधील कणखरता पाहिली, तर अबला या शब्दाचा अर्थ अधिक बळ असलेली, असा जाणवेल. स्त्रियांवर अत्याचार होतात, विनोद होतात, शेरेबाजी होते, तरी स्त्रिया डगमगत नाहीत, मौनाने प्रत्युत्तर देतात. एका लेखकाने तर असेही म्हटले आहे, की ज्यादिवशी स्त्रिया आपले मौन तोडतील, त्यादिवसापासून पुरुष ताठ मानेने चालू शकणार नाहीत. यावरून स्त्रियांच्या मौनाची, कणखरतेची, सहनशीलतेची आणि सक्षमतेची कल्पना आपल्याला आली असेल. याच वाक्याला दुजोरा देणारे मत आचार्य चाणक्य यांनी दूरदृष्टीने नोंदवून ठेवले आहे.

संयम :
स्त्री चंचल आहे असे म्हणतात, हे खरे आहे. परंतु तिच्या ठायी जेवढा संयम आहे, तेवढा संयम पुरुषात नाही. एका उदाहरणात सांगायचे झाले, तर एक स्त्री दुसऱ्या जीवाला जन्म देण्यासाठी सोसत असलेली गर्भावस्था, प्रसूतिकाळ आणि ओघाने येणारे बाळाचे संगोपन व त्यानंतरही आयुष्यभर न मिटणारी काळजी!
शक्ती:
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये निसर्गतः शक्ती कमी असली, तरीदेखील त्यांनी युद्धशिक्षण, स्वसंरक्षण, कवायती, खेळ अशा गोष्टींचे बालपणापासून प्रशिक्षण घेतले तर त्या प्रतिकार करताना जराही कमी पडणार नाहीत. त्यामुळे स्त्रियांना दुर्बल समजणे ही चूक ठरेल. दुर्बल त्या नसून त्यांची जडण घडण दुर्बल असू शकते.उदाहरण घ्यायचे असेल, तर सप्तशतीची पोथी घ्या, इतिहासातील स्त्रियांचा पराक्रम घ्या नाहीतर अलीकडचे ऑलिंपिक्स स्पर्धेतल्या स्पर्धक घ्या!
निर्णयक्षमता:
पुरुषांच्या तुलनेत निर्णय क्षमतेत स्त्रिया अग्रेसर असतात. त्यांच्या मनात कितीही गोंधळ असो, परंतु प्रसंग जेव्हा निर्णय घेण्याबाबत असतो, त्यावेळी सर्वतोपरी विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असते. म्हणूनच एकीकडे आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचतो, त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला महिला शेतकऱ्यांच्या कर्तृत्त्वाच्या कथा वाचतो.
संघटनक्षमता :
परिस्थितीशी जुळवून घेण्यात स्त्रिया पुरुषांपेक्षा सरस असतात. त्यामुळे त्या जिथे जातात, तिथे पटकन रुळतात, लोकांशी जोडल्या जातात. एका वेळेस अनेक लोकांना जोडून ठेवण्यासही त्या सक्षम असतात. शांत, अबोल स्त्रियांमध्येही संघटनक्षमता असते. ती निसर्गतः मिळालेली देणगी असते. याउलट पुरुषांना परिस्थितीशी, लोकांशी जुळवून घ्यायला स्त्रियांच्या तुलनेत वेळ लागतो.