‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:59 IST2025-05-20T15:53:29+5:302025-05-20T15:59:37+5:30

नित्यनेमाने स्वामी सेवा करत असला, तरी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. तुमच्याकडून काही राहून तर जात नाही ना? जाणून घ्या...

प्रारब्ध कुणालाच चुकलेले नाही. जे आयुष्यात घडायचे आहे, ते घडणारच आहे. परंतु, जर गुरुकृपा आणि गुरुबळ आपल्या पाठीशी भक्कमपणे असेल, तर समस्या सुसह्य होतात, अडचणीतून मार्ग काढण्याची ऊर्जा, प्रेरणा मिळते, असे म्हटले जाते. गुरुबळ आणि गुरुकृपा लाभण्याचे अनेक मार्ग सांगितले जातात. यापैकी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे नाम आणि सेवा. आपण गुरुचे स्मरण, नामजप करून, सेवा करून आपल्याला त्यांचे कृपांकित करण्याचे प्रयत्न करू शकतो, असे म्हणतात.

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर भक्तांना दिलेले अभय आहे, असे मानले जाते. तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी, ही स्वामी भक्तांची कालातीत श्रद्धा आहे. गुरुवारी विशेष करून स्वामींचे पूजन, स्वामी सेवा केली जाते.

स्वामी पाठीशी नित्य असतात, असा हजारो भाविकांचा अनुभव आहे. काही अनुभव आल्यानंतर स्वामी चरणांशी लीन होणारेही अनेक जण आहेत. अनेक जण आपापल्या परिने स्वामींची सेवा करीत असतात. श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो.

कोट्यवधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा, उपासना, नामस्मरण, पूजन करत असतात. अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत. परंतु, स्वामींची नियमित सेवा करत असाल, तर काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

अनेकदा गोष्टी सकारात्मक घडत नाही, असे वाटू लागते. अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की, नकारात्मकता निर्माण होऊ लागते. मात्र, असे घडत असेल, तर स्वामींवरील विश्वास कायम ठेवावा, असा सल्ला दिला जातो. आपण जे करतो, ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावे, असे सांगितले जाते.

कोणतीही सेवा असो, ती अगदी प्रामाणिकपणे, निर्मळ मनाने, एकाग्रतेने, मनापासून आणि शंभर टक्के समर्पण भाव ठेवूनच करावी. उत्कट भाव-भक्तीची ताकद मोठी असून, अशक्यही शक्य होण्याची किमया त्यात असते, असे मानले जाते. स्वामी सेवा करताना नेमक्या कोणत्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया...

स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल, तर तिन्ही सांजेला, दिवेलागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी.

एकदा वेळेचा मनात संकल्प केला की, काही झाले तरी शक्यतो वेळ चुकवू नये. एखाद्या वेळेस चुकलीच तर स्वामींना क्षमायाचना करावी. स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावा. स्वामींसमोर दिवा लावावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल.

स्वामींच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला तर उत्तमच. स्वामींच्या नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा. यानंतर स्वामींची मानसपूजा करावी. तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे. याचे २१ अध्याय आहेत. दररोज ३ अध्यायाचे पठण केले, तरी सात दिवसांत एक पारायण पूर्ण होऊ शकेल. शक्य असल्यास पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी.

यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा. तसेच किमान एक माळ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जप करावा. एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम. परंतु, यथाशक्ती जप, नामस्मरण करावे. शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी. शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी. खंड पडू नये.

काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामी समर्थांची मनापासून क्षमायाचना करावी. तसेच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा. ही सेवा करताना निःशंक मनाने करावी. कोणताही किंतु मनात ठेवू नये.

स्वामींवर अपार श्रद्धा ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, यावर विश्वास ठेवा. स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव असावा. स्वामींवरील निष्ठा कधीही गमावू नका. सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री बाळगा.

स्वामींची नित्य सेवा केल्यास जीवन समृद्ध होईल. स्वामी कृपेमुळे जीवन आणखी उन्नत होईल. हे सर्व करत असताना मनात विश्वास आणि भक्ती ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या सेवेला योग्य दिशा देऊन, स्वामींच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती साधता येईल.

सेवेतून काहीतरी मिळावे, अशी अपेक्षा आपुसकच केली जाते. परंतु, केवळ काहीतरी मिळण्यासाठी सेवा करू नये. आपण केवळ आपले कर्म करत राहावे, स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट फळ देतील, याबाबतही निश्चिंत असावे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ।। श्री स्वामी समर्थ ।।