माझी सगळी पदकं तुमची, तुमच्यापुढे मी कुणीच नाही; ऑलिम्पिकमधील 'गोल्डन गर्ल'चा डॉक्टरांना सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:35 PM2020-07-06T16:35:06+5:302020-07-06T16:39:49+5:30

जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 84,921 इतकी झाली आहे. त्यापैकी 5 लाख 37,362 रुग्ण दगावले असून 65 लाख 52,292 रुग्ण बरी झाली आहेत.

या कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्या त्यागाचं सर्वंच कौतुक करत आहेत. पण, आपणही त्यांना मदत म्हणून घरीच राहण्याची गरज आहे.

स्पेनमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. आतापर्यंत तेथे 2 लाख 97, 625 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 28,385 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी झटणाऱ्या डॉक्टर्स यांच्यासाठी स्पेनची स्टार बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीननं मोठा निर्णय घेतला आहे. तिनं आतापर्यंत जिंकलेली सर्व पदकं या डॉक्टर्सना देण्याची तयारी दर्शवली आहे.

ती म्हणाली,''ते खरे नायक आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करताना मी त्यांना माझी सर्व पदकं देऊ केली आहेत. तेच याचे खरे हकदार आहेत.''

तिनं बार्सिलोना येथील सॅनीटास सिमा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. येथे एका 100 वर्षीय रुग्णानं कोरोनावर मात केली.

मरीन म्हणाली,''हे प्रेरणादायी आहे. मी या सर्व आरोग्य सेवकांचे आभार मानते. माझी सगळी पदकं तुमची, तुमच्यापुढे मी कुणीच नाही.''