भारतात बनणार जगातील पहिली उडणारी कार; एका टाकीत 500 किमी अंतर कापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 11:05 AM2020-03-15T11:05:58+5:302020-03-15T11:15:43+5:30

उडणारी कार बनविणारी कंपनी PAL-V ने याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे ही कंपनी गुजरातमध्ये या कारची निर्मिती करणार आहे.

भारतीयांचे उडणाऱ्या कारमधून फिरण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. ही कार येत्या काळात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतातच बनविली जाणार आहे.

उडणारी कार बनविणारी कंपनी PAL-V ने याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे ही कंपनी गुजरातमध्ये या कारची निर्मिती करणार आहे.

या कारला कंपनीने जिनिव्हा मोटर शो 2018 मध्ये दाखविले होते.

कंपनी या कारचे उत्पादन 2021 पासून सुरू करणार आहे. आधीच या 100 कारची बुकिंग कंपनीला मिळालेली आहेत. या कार अमेरिकेसह युरोपमध्ये निर्यात केली जाणार आहे. तर काही कार फिल्म इंडस्ट्रीसाठीही बनविण्यात येणार आहेत.

कंपनीच्या दाव्यानुसार ही कार तीनचाकी असणार आहे. मात्र, तिला हेलिकॉप्टरचा प्रारुप देण्यात आले आहे. या कारची किंमत 4.3 कोटी रुपये असून उत्पादनही सुरु झाले आहे. या कारची पहिली डिलिव्हरी 2021 पासून सुरू होणार आहे.

या मिनी हेलिकॉप्टरची बॉडी कार्बन फायबरपासून तयार केलेली आहे. तर आतील पार्ट हे अॅल्युमिनिअम आणि टायटॅनिअमसारख्या हलक्या धातूंपासून बनविण्यात आले आहेत. या कारचे वजन मारुतीच्या स्विफ्टपेक्षाही कमी म्हणजे 680 किलो असणार आहे.

या कारला टेकऑफ करण्यासाठी 165 मीटरचीच जागा लागणार आहे. या गाडीच्या वरच्या बाजुला रिअर प्रोपेलर लावण्यात आले आहेत. गरज नसली तर ते बाजुला काढता येतात. या प्रोपेलरमुळे ही कार तब्बल 12500 फूट उंचीवर उडू शकते.

ही कार 322 किमी प्रति तास एवढ्या प्रचंड वेगाने उडू शकते. रस्त्यावर ही कार 180 किमीच्या वेगाने धावू शकते. या कारमध्ये दोन व्यक्ती बसू शकतात. रस्त्यावर धावताना या कारमध्ये तीन व्यक्तती बसू शकतात.

या कारमध्ये 230 एचपीचे चार सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंगचे फिचर नाही. ही कार गायरोकॉप्टरमध्ये बदलण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ लागतो. तर ही कार 0 ते 100 किमीचा वेग केवळ 8 सेंकंदांमध्ये घेते.

एक बटन दाबताच या कारचे ब्लेड दुमडतात. ही जगातील पहिली ‘ड्राइव्ह अँड फ्लाय’ कार आहे. ही कार खरेदी करण्यासाठी केवळ एकच अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे पायलट आणि वाहन चालकाचे लायसन्स असणे गरजेचे आहे.

ही कार तीन मिनिट रस्त्यावर धावून उडणार आहे. जेव्हा ही कार उतरेल तेव्हा एक इंजिन काम करणार आहे. 102 लीटरची फ्युएल टाकी देण्यात आलेली असून एका टाकीत ही कार 500 किमी उडू शकते. तर रस्त्यावर 1200 किमी अंतर कापणार आहे.