फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले

By हेमंत बावकर | Published: May 11, 2024 11:50 AM2024-05-11T11:50:45+5:302024-05-11T11:57:24+5:30

Volkswagen Taigun Review in Marathi: सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. लाखो रुपये घालून आपण आपले कारचे स्वप्न पूर्ण करतो आणि जर कारच आपल्या व आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित नसेल तर... शिवाय मायलेजही आहेच...

गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कार येऊ लागल्या आहेत. यामध्ये पाच कंपन्यांचा समावेश असून जवळपास १० पर्याय भारतीय ग्राहकांकडे उपलब्ध आहेत. यापैकीच एक फोक्सवॅगन कंपनीची टायगून ही एसयुव्ही आहे. ही कार आमच्याकडे रिव्ह्यूसाठी आली होती. जवळपास आम्ही ही कार ३५० किमी चालविली. मायलेज व फिचर्सच्या बाबतीत आम्हाला ही कार कशी वाटली....

सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. लाखो रुपये घालून आपण आपले कारचे स्वप्न पूर्ण करतो. यामुळे सुरक्षा ही खूप महत्वाची आहे. आपली फॅमिली या कारमधून प्रवास करत असते. फोक्सवॅगन टायगून हा दणकटपणा दरवाजाच्या थड आवाजापासून दाखवायला सुरुवात करते. आतमध्ये बऱ्यापैकी स्पेसिअस असून मागे डिक्कीमध्ये तीन-चार जणांचे आठवड्याच्या बॅगा, साहित्या आरामात मावेल एवढी बुट स्पेस आहे.

दरवाजांमध्ये पाण्याच्या बॉटल, छोटी छत्री आदी गोष्टी ठेवण्यासाठी पुरेशी जागा. मोबाईल चार्ज करण्यासाठी फास्ट चार्ज होण्यासाठी मात्र टाईप सी कनेक्टर आहे. तुमच्याकडे जुनी केबल असेल तर फक्त टाईप सी वाली केबल विकत घ्यावी लागणार आहे. स्टेअरिंगवर कंपनीने सर्व कंट्रोल दिले आहेत. फक्त हेडलाईट, इंडिकेटर आणि वायपरचे कंट्रोल उलट्या दिशेला आहेत. त्याची सवय होईपर्यंतच चुकायला होते. एवढाच काय तो बदल.

टायगुन आम्ही जवळपास दगड गोट्यांच्या रस्त्यावर, उन्हात, रात्रीच्या वेळी चालवून पाहिली. रात्रीच्या प्रवासासाठी हेडलाईटचा फोकस चांगला वाटला. कुठेही समोरून लाईट पडली तर कारसमोरील व्हिजिबिलीटी कमी झाल्याचे जाणवले नाही.

कारचा एसी सर्व केबिन बऱ्यापैकी थंड करतो. शिवाय व्हेंटिलेटेड सीट देखील आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे सनरुफचे आतील कव्हर हे जाड असल्याने ४१ डिग्री तापमानातही आतमध्ये डोक्याला उष्णता जाणवत नाही. इतरांशी तुलना केली असता त्यांचे कव्हर खूप पातळ असते यामुळे आतमध्ये उष्णता लगेच जाणवते. याचा एसीच्या कुलिंगवही परिणाम होतो. तो टायगुनमध्ये जाणवत नाही.

पिकअपच्या बाबतीत कारने नाउमेद केले नाही. १.० लीटर पेट्रोल इंजिन असले तरी कारचे वजनही जास्त आहे. तरी देखील कार बऱ्यापैकी पिकअप घेत होती. यामुळे वारंवार गिअर बदलण्याची गरज पडत नव्हती. याचा परिणाम मायलेजवरही दिसून येत होता.

कारने आम्हाला शहरात ६-८ किमी आणि हायवेवर १८.९ पर्यंतचे मायलेज दिले. मिक्स मायलेज हे जवळपास १० किमी प्रति लीटर एवढे होते. सुरुवातीला कारचे इंजिन जास्त आवाज करते. परंतु एकदा का तुम्ही तिसरा -चौथा गिअर टाकला की केबिनमध्ये आवाज येत नाही. एकदम स्मूथ कार चालू लागते. आमच्याकडे ६ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सची कार आली होती.

इंटेरिअची बाब म्हणजे मोठी इंन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही गाणी लावणे, वेगवेगळी अॅप इन्स्टॉल करणे यासह कारच्या परफॉर्मन्सची माहिती देखील पाहू शकता. इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देखील सुटसुटीत माहिती दिसेल असा मोठा दिलेला आहे.

कारचा क्रूझ कंट्रोल देखील आम्ही हायवेववर वापरून पाहिला. मायलेज आणि चालविताना थोडे रिलॅक्स वाटण्यासाठी हा चांगला वाचला. परंतु एक कमी यामध्ये होती. ती म्हणजे क्रूझ कंट्रोलमध्ये कार उताराला असली तर ती एकदम जास्तीचा स्पीड घेत होती. आम्ही पुणे-कोल्हापूर हायवेवर ८० ची वेगमर्यादा असल्याने ७४ चा स्पीड सेट केला होता. काही ठिकाणी उताराला कारने ८०-८१ पर्यंत वेग घेतला होता. खरेतर स्पीड गनपासून वाचण्यासाठी हे फिचर चांगले आहे. परंतु अचानक वेग वाढल्याने उताराला सावध राहिलेलेच चांगले वाटले.

ही कार फॅमिलीसाठी, सिंपल सोबर लुकसह तरुणाईला भावणारी आहे. कारमध्ये पाच जण आरामात बसू शकतात एवढी स्पेस आहे. सीट कंफर्टेबल आहेत. यामुळे सुरक्षा आणि मायलेज या गोष्टींवर ही कार आम्हाला उजवी वाटली.