नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:43 IST2025-03-24T13:35:16+5:302025-03-24T13:43:16+5:30

Nissan Magnite 2024 review in Marathi: निस्सानची ही नव्या पिढीची टर्बो सीव्हीटी कार आम्ही जवळपास २२० किमी चालविली. मायलेज, खड्ड्यांमध्ये कशी वाटली, पिकअप आणि कंफर्टसाठी कशी वाटली, ते आपण पाहुया.

बोल्ड मस्क्युलर लुकमध्ये, परवडणाऱ्या किंमतीत, सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आज तुम्हाला कोणती कार नजरेत भरते? कोणाच्या कार या दिसतात बोल्ड पण तिची लगेज स्पेस किंवा आतील स्पेस पाहिली तर ती लांबच्या टूरसाठी किती उपयोगाची आहे, ते त्यांनाच माहिती. मोठी बुट स्पेस हवी असेल किंवा प्रशस्त कार हवी असेल तर एकतर पैसे जादा मोजावे लागतात किंवा मग हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यातीलच एक आहे निस्सानची मॅग्नाईट.

निस्सानची ही नव्या पिढीची टर्बो सीव्हीटी कार आम्ही जवळपास २२० किमी चालविली. मायलेज, खड्ड्यांमध्ये कशी वाटली, पिकअप आणि कंफर्टसाठी कशी वाटली, ते आपण पाहुया. लुकवाईज मॅग्नाईट ही मस्क्युलर आणि आकर्षक आहे. ३,९९४ मिमी लांब आणि १७५८ मिमी रुंद असलेल्या या एसयूव्हीचा व्हीलबेस २५०० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स २०५ मिमी आहे. यामुळे चार व्यक्ती, त्यांच्या लगेजसह प्रवास करत असताना शहरातून स्पीडब्रेकर, गावातील रस्त्यांवर ग्राऊंड क्लिअरंस चांगला मिळाला.

खड्ड्यांच्या रस्त्यांवर गाडीमध्ये दणके जाणवले नाहीत. खड्ड्यांत टायर आदळल्याचे आवाज आतमध्ये जाणवत होते, परंतू त्याचा फारसा परिणाम आतल्या व्यक्तींना जाणवत नव्हता. लाईटचा थ्रो चांगला आहे, जेणेकरून रस्ता, वळणे व्यवस्थित दिसतात. एलईडी लाईट असल्याने थोडा जास्त व्हाईट थ्रो आहे, हा थोडा यलोईश असायला हवा होता. पाठीमागे एलईडी टेललाईट देण्यात आलेल्या आहेत. आतमध्ये अॅम्बिअन्ट लाईट आहे.

निस्सानने भारतीय बाजारासाठी एक प्रॅक्टीकल कार बनविली आहे. बुटस्पेस मोठी आहे, आतमध्ये मागील सीटवर प्रवासी बसल्यानंतर चांगली लेगस्पेस, आरामदायी सीट, मागच्या लोकांसाठी एसी व्हेंट, चार्जिंग, मागील दरवाजांमध्ये पाण्याच्या बॉटल ठेवण्यासाठी तसेच इतर गोष्टी ठेवण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आलेली आहे. अनेक गाड्यांमध्ये या सर्वांची उणिव भासते. कारण कॉम्पॅक्ट एसयुव्हीच्या नावाखाली एवढी कॉम्पॅक्ट करून ठेवतात की आतमध्ये सहा फुटच नाही तर साडेपाच फुटांवरचा व्यक्तीही नीट बसू शकत नाही. निस्सानने ही चूक टाळली आहे. सीट फोल्ड केल्यावर 690 लीटर एवढी मोठी बुटस्पेस मिळते.

अपडेटेड ८-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले, वायरलेस फोन चार्जर, मल्टीपल यूजर इंटरफेससह ७-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ४ स्पीकर आणि २ ट्विटरसह साउंड सिस्टम आदी फिचर्स देण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे यात क्रूझ कंट्रोलही देण्यात आला आहे. निस्सानने सुरक्षेचीही काळजी घेतलेली आहे.

सुरक्षेसाठी सहा एअरबॅग देण्यात आलेल्या आहेत. ३६० कॅमेरा देण्यात आलेला आहे. जो चांगल्याप्रकारे व्ह्यू दाखवितो. कूल्ड ग्लव बॉक्स आणि पुढील दोन सीट या हीट गार्ड फीचर म्हणजेच कुलिंग वाल्या आहेत. उन्हातून गेल्यावर लगेचच नाही परंतू काही वेळात थंड होतात. एसी देखील चांगला थंड हवा देणारा आहे. वळणावर कार चांगल्या प्रकारे कंट्रोल ठेवते. थोडा बॉडीरोल जाणवतो, परंतू एवढ्या उंच स्टान्सला तो ठीक आहे.

सीट कंफर्टेबल आहेत. सहा फुटांपेक्षा जास्ती उंच व्यक्तीही आरामात बसू शकतो. या कारमध्ये 1.0 लीटरचे 3 सिलिंडर टर्बो इंजन देण्यात आले आहे. साधे पेट्रोल इंजिनही आहे. हा पर्याय कमी किंमतीत उपलब्ध आहे. टर्बो इंजन हवे असेल तर थोडे जास्त पैसे मोजावे लागतात. या इंजिनमध्ये चार प्रवासी आणि त्यांचे लगेज आरामात वाहून नेण्याची पुरेशी ताकद आहे. यावेळी आम्हाला घाटरस्त्यातून कार चालविता आली नाही, परंतू चढ उतार किंवा सिग्नल, स्पीडब्रेकवर या कारने पिकअपसाठी झगडतेय असे वाटू दिले नाही. बऱ्याच पेट्रोल गाड्या या इथेच मार खातात. परंतू, इंजिनमध्ये डिझेलसारखी ताकद वाटली.

चढणीला किंवा शहरात सारखे सारखे गिअर चेंज करतेय असेही वाटले नाही. यामुळे पिकअप मार खातो आणि ओव्हरटेक करताना किंवा पुढे जाताना अंदाज चुकण्याची शक्यता असते. मायलेजचे बोलायचे झाले तर कारने आम्हाला १४.२ चे संमिश्र मायलेज दिले. सीव्हीटी टर्बो इंजिनला इतर कारच्या तुलनेत हे सरासरी पाहता ठीक वाटले. किंमत, फिचर्स आणि इतर गोष्टी पाहता ही कार सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटसाठी चांगला पर्याय ठरू शकते.