Skoda Slavia: मार्चमध्ये सुरू होणार 'स्कोडा स्लाव्हिया'ची टेस्ट ड्राइव्ह; सुझुकी सियाझ आणि होंडा सिटीशी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 05:48 PM2022-01-31T17:48:49+5:302022-01-31T17:57:10+5:30

स्कोडा स्लाव्हिया सेडान पाच रंगांमध्ये उपलब्ध असून, या गाडीची अंदाजे किंमत 10-17 लाख रुपये असू शकते.

स्कोडा ऑटो इंडिया (Skoda Auto India) आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या आगामी प्रीमियम सेडान स्लाव्हिया (Slavia) ची टेस्ड ड्राइव्ह सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या मार्च महिन्यात स्लाव्हिया गाडी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने या महिन्यात पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पातून स्लाव्हिया सेडानची पहिली तुकडी आणण्यास सुरुवात केली आहे.

मार्चपासून टेस्ट ड्राइव्ह सुरू- स्कोडा ऑटो इंडियाचे विक्री आणि विपणन संचालक जॅक हॉलिस यांनी सांगितले की, पुढील काही आठवड्यात स्लाव्हिया सेडान शोरुममध्ये दाखल होण्याची अपेक्षा आहे. होमोस्लोगेशनमच्या प्रक्रियेत थोडा उशीर झाला. होमोस्लोगेशन म्हणजे, सरकारकडून एखाद्या गाडीला मिळणारे सर्टीफीकेशन आहे.

सेडान कॅटेगरीत मोठी टक्कर- स्कोडा भारतात सेडान सेगमेंटला पुनरुज्जीवित करण्यासाठी स्लाव्हियासोबत मोठी बाजारात येत आहे. अलिकडच्या वर्षांत एसयूव्ही आणि हॅचबॅकच्या लोकप्रियतेमुळे सेडान कॅटेगरीत ग्राहकांचा रस काही प्रमाणात कमी झाला आहे. हॉलिसने सांगितले की, मागील काही काळात कोणत्याच कंपनीने सेडान लॉन्च केलेली नाही, त्यामुळे स्लाव्हिया खूप महत्त्वाची आहे.

Skoda रॅपिडची जागा घेईल- स्कोडा स्लाव्हियाची अधिकृत बुकिंग आधीच देशभरात सुरू झाली आहे. आगामी स्लाव्हिया व्यतिरिक्त, स्कोडा देशात स्कोडा ऑक्टाव्हिया आणि स्कोडा सुपर्ब या कारचीदेखील विक्री करते. स्लाव्हिया स्कोडाच्या प्रीमियम सेडान लाइन-अपमध्ये सामील होईल. स्कोडा स्लाव्हिया कंपनीच्या स्कोडा रॅपिडची जागा घेईल.

रॅपिडपेक्षा मोठी- मेड-इन-इंडिया MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित Kushaq SUV नंतर स्लाव्हिया ही स्कोडाची दुसरी कार आहे. नवीन स्कोडा सेडानची एकूण लांबी 4541 मिमी, रुंदी 1752 मिमी आणि उंची 1487 मिमी आहे. याचा व्हीलबेस 2651 मिमी आहे, जो त्याच्या विभागातील सर्वात लांब आहे. रॅपिडच्या तुलनेत, स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 20 मिमी उंच आहे. ही फर्स्ट जनरेशन ऑक्टाव्हियापेक्षाही मोठी आहे.

इंजिन आणि पॉवर- नवीन स्कोडा सेडान दोन TSI टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असेल. पहिले 1.0-लिटर, 3-सिलेंडर TSI इंजिन आहे. हे इंजिन 115 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. हे एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. सेडान 1.5-लिटर, 4-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिनसह देखील उपलब्ध असेल. हे इंजिन 148 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले आहे.

उत्तम वैशिष्ट्ये- नवीन स्लाव्हियाची आतील बाजू ऑक्टाव्हियासारखीच आहे. बटणे, टच-आधारित हवामान नियंत्रण आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यासह त्याचे काही स्विचगियर्स आणि ट्रिम्स कुशकप्रमाणे दिसतात. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डॅशबोर्ड इंटिग्रेटेड 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. या सेडानला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग पॅड, व्हेंटिलेटेड सीट्स, लेदर अपहोल्स्ट्री, ऑटो डिमिंग इंटरनल रिअर व्ह्यू मिरर, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार फीचर्स आणि बरेच काही मिळते.

सेफ्टी फीचर्स- सुरक्षेच्या दृष्टीने नवीन स्लाव्हिया सेडानमध्ये 6 एअरबॅग्ज, एक मागील पार्किंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, हिल होल्ड कंट्रोल (पर्यायी), इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल सिस्टम (EDS), मल्टी-कॉलिजन ब्रेक्स आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम आहे. नवीन स्कोडा सेडान या विभागातील सर्वात मोठा व्हीलबेस मिळतो, ज्यामुळे अधिक लेगरूम मिळते.

एक्सटीरिअर लुक आणि स्टाइल- एक्सटीरिअर लुक आणि स्टाइलिंगच्या बाबतीत या स्कोडा सेडानला ब्रँडची सिग्नेचर बटरफ्लाय ग्रिल आणि L-आकाराचे DRL सह स्लीक हेडलॅम्प आणि उलटे L-आकाराचे मोटिफ असलेले फॉग लॅम्प्स मिळतात. याशिवाय, टेललँपपर्यंत ठळक रेषा दिसून येते. साइड प्रोफाईल 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील (केवळ टॉप-एंड ट्रिमसाठी) आणि विंडो लाईनभोवती क्रोम ट्रिमसह डिझान केलेले आहे. कारच्या मागील बाजूस C-आकाराचे LED टेललॅम्प आणि क्रोम स्ट्रिपसह बंपर आहेत.

किंमत- कंपनीने सांगितल्यानुसार, स्लाव्हिया सेडान पाच रंगांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये कँडी व्हाइट, टोर्नाडो रेड, कार्बन स्टील, रिफ्लेक्स सिल्व्हर आणि क्रिस्टल ब्लू या रंगांचा समावेश आहे. तसेच, या सेडानची अंदाजे किंमत 10-17 लाख रुपये असेल. या गाडाची स्पर्धा भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी सियाझ, ह्युंदाई व्हर्ना, होंडा सिटी आणि आगामी फॉक्सवॅगन वर्ट्सशी स्पर्धा असेल.