मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
By हेमंत बावकर | Updated: May 5, 2025 09:29 IST2025-05-05T09:18:32+5:302025-05-05T09:29:25+5:30
MG Astor 2025 Review in Marathi : देशातील तरुण वर्ग सध्या सेदान, हॅचबॅक कारपासून कॉम्पॅक्ट, मध्यम एसयुव्हींकडे वळू लागला आहे. थोडी हायटेक फिचर्स दिली की या तरुणाईला याची भुरळ पडते.

हेमंत बावकर
एमजी नावाच्या कंपनीने सध्या भारतीय बाजारात धूम उडविली आहे. कमी किंमतीत मर्सिडीज, बीएमडब्ल्यू सारख्या कंपन्यांना तोडीस तोड कार भारतीय बाजारात आणल्या आहेत. हायटेक फिचर्स, इंटरनेट कनेक्टीव्हीटी असलेल्या या कार या कंपनीने आणून एकप्रकारे भारतीय तरुण वर्ग काय चीज वापरू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याच त्यांच्या ताफ्यातील एमजी अॅस्टर आम्ही सुमारे २५० किमी चालविली, पुण्यातील ट्रॅफिक, रात्रीचा प्रवास ते गावखेड्यातील रस्त्यांवरून या कारने आम्ही भटकंती केली. कशी वाटली ते पाहुया...
देशातील तरुण वर्ग सध्या सेदान, हॅचबॅक कारपासून कॉम्पॅक्ट, मध्यम एसयुव्हींकडे वळू लागला आहे. थोडी हायटेक फिचर्स दिली की या तरुणाईला याची भुरळ पडते. एमजीने या सेगमेंटमध्ये तगडी स्पर्धा असताना काही वर्षांपूर्वी अॅस्टर ही पूर्णपणे पेट्रोल इंजिन असलेली कार बाजारात आणली आहे. पॉश इंटेरिअर, लुक आदी गोष्टींमुळे ही कार या स्पर्धेतील कारमध्ये उठून दिसते. क्रूझ कंट्रोल, अडास, सेफ्टी फिचर्स आणि एआय वाला छोटासा रोबोट या कारचे वैशिष्ट्य आहे.
पिक अपच्या बाबतीत बोलायचे झाले तर यात सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यामुळे कारला पिकअपची समस्या जाणवली नाही. परंतू, पिकअप घेताना इंजिन थोडे जास्तच गुरगुरते, यामुळे मायलेजवरही परिणाम होतो. कुठेही चढाला किंवा स्पीड ब्रेकरला कारने कच खाल्ली नाही. हायवेवर कारची अडास प्रणाली चांगल्या प्रकारे काम करत होती.
लेन असिस्टही पुणे-बंगळुरू हायवेवरील पुसट होत गेलेले पट्टे चांगल्या प्रकारे ओळखत होता. पुढे कोणतेही वाहन असेल तर चालकाला सूचना दिल्या जात होत्या. छोटासा रोबोट बरीच कामे करत होता. हॅलो अॅस्टर म्हटले की डोळे मिचकावून पुढच्या सूचनांचे पालन करत होता. माहिती नसेल तर सरळ माफी मागून आपल्याला ही गोष्ट माहिती नाही, असे सांगत होता. सनरुफ उघडायचे बंद करायची कमांड घेत होता, गाणे लावायचे असेल तर ते देखील करत होता. जवळपास आय-स्मार्ट २.० सह ८०+ कनेक्टेड कार फीचर्स आहेत. लहान मुले याचा वेगळाच आनंद घेतात.
मायलेजबाबत सांगायचे झाले तर आम्ही बहुतांश प्रवास हा हायवेवरून केला. लोकल रस्त्यांवर ३० किमी आणि शहरात ४० एक किमीचा प्रवास केला. या संमिश्र प्रवासात कारने १० किमी प्रति लीटरचे मायलेज दिले. इतर कंपन्यांच्या तुलनेत हे कमी आहे. याकडे कंपनीने थोडे लक्ष द्यायला हवे. गाडी उठविताना इंजिन जास्त पावर घेण्यासाठी थोडा संघर्ष करते, याचा फटका मायलेजला बसला.
गाणी ऐकताना कुठेही कॉस्ट कटिंग केल्याचे आढळले नाही. उत्तम दर्जाचे स्पीकर या कारमध्ये देण्यात आले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारची गाणी ऐकताना क्वालिटी हलल्याचे जाणवले नाही. तसेच स्टीअरिंगवर मल्टीमीडिया कंट्रोल असल्याने ते देखील सोईचे ठरले होते. उन्हाळ्यात एसी चांगल्याप्रकारे काम करत होता. कुठेही स्वेटिंग जाणवले नाही. तसेच व्हेंटिलेटेड सीट असल्याने पुढील दोघांना उकाड्याचा त्रास जाणवला नाही.
क्रूझ कंट्रोल व्यवस्थित काम करत होता. 17.78 cm डिजिटल क्लस्टरवर व्यवस्थित माहिती दाखविली जात होती. 25.7cm एचडी टचस्क्रीनही व्यवस्थित काम करत होती. सारखे सारखे स्क्रीनवर टच करावे लागत नव्हते, एवढी स्मूथ होती. ड्युअल टोन इंटिरिअर कारला पॉश लुक देत होते. याचबरोबर लेदर फिनिशही होते. या कारमध्ये पाचजण आरामात बसू शकतात.
चार-पाच जणांच्या एका आठवड्या भराच्या टूरसाठी पुरेशी अशी बुट स्पेस देण्यात आली आहे. स्टेपनीमुळे थोडी वर आहे, परंतू आरामात चार जणांचे साहित्य मावेल एवढी स्पेस आहे. लेगस्पेसही चांगली आहे. सहा फुटाचा व्यक्तीही मागील सीटवर आरामात बसू शकतो एवढी. डोअरमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी देखील सोय आहे.
भारतीय ग्राहकांना सध्या बाकी कशाची नाही परंतू सनरुफची आणि सेफ्टीची जास्त क्रेझ आहे. या कारमध्ये भला मोठा सनरुफ दिलेला आहे. जो एका कमांडवर उघडतो. तसेच या कारला एशियन एनकॅप व भारत एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आहे. लेव्हल २ एडास, सहा एअरबॅग, हिल होल्ड कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा, टीपीएमएस आदी उपयोगाची फिचर्सही देण्यात आली आहेत.