Mahindra and Mahindra Story: महिंद्राचे संस्थापक पाकिस्तानचे पहिले अर्थ मंत्री होते, जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर कंपनीची कहानी...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 04:37 PM2022-11-20T16:37:38+5:302022-11-20T16:44:06+5:30

Mahindra and Mahindra Story: आज लोकांना महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रा एवढेच माहिती आहेत. आज जुन्या काळातल्या जीपपासून ते आताच्या एअरव्हॅनपर्यंतची उत्पादने महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी बनविते.

आज लोकांना महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रा एवढेच माहिती आहेत. आज जीप ते एअरव्हॅनपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी बनविते. रस्त्यांवर स्कॉर्पिओ, बोलेरो सारख्या एसयुव्हींनी महिंद्राचे नाव केले आहे. परंतू ही कंपनी ट्रॅक्टर बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज ही कंपनी बँक, एअरोस्पेसपासून विविध क्षेत्रांत पसरलेली आहे. या कंपनीची कहानी खूप इंटरेस्टिंग आहे.

आनंद महिंद्रांनी काही ट्विट केले आहेत. जेव्हा देश स्वातंत्र्याची लढाई लढत होता, तेव्हा के.सी. महिंद्रा, जे.सी. महिंद्रा आणि मलिक गुलाम मोहम्मद यांनी एकत्र येऊन महिंग्रा अँड मोहम्मद या नावाने कंपनी स्थापन केली होती. २ ऑक्टोबर १९४५ मध्ये पंजाबच्या लुधियानामध्ये एक स्टील ट्रेडिंग कंपनीच्या रुपात या कंपनीची सुरुवात झाली होती. मोहम्मद यांची छोटीशी हिस्सेदारी होती, तरी देखील जे.सी. महिंद्रा यांनी त्यांचे नाव कंपनीच्या संस्थापकांमध्ये घेतले.

देशाची फाळणी झाली तेव्हा गुलाम मोहम्मद यांनी कंपनी नाही तर पाकिस्तानला निवडले. ते पाकिस्तानला गेले. तिथे ते पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री झाले. पुढे जाऊन १९५१ मध्ये ते पाकिस्तानचे गव्हर्नर देखील झाले. मात्र, गुलाम यांच्या पाकिस्तानात जाण्याने कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला. कंपनीच्या नावावरून भारतात चर्चा होऊ लागली. कंपनीची सर्व स्टेशनरी M&M नावाने छापली गेली होती. यामुळे दुसरे नाव ठेवणे देखील महिंद्रांना कठीण गेले. कारण त्याचेही मोठे नुकसान झेलावे लागले असते.

अखेर जे.सी. महिंद्रा यांनी खूप विचार करून कंपनीचा M&M टॅग तसाच ठेवला फक्त मोहम्मद हे नाव बदलून तिथे आणखी एक महिंद्रा जोडले. यामुळे ही कंपनी पुढे महिंद्रा अँड महिंद्रा म्हणून ओळखली जाऊ लागली. स्वातंत्र्यानंतर कंपनीचे नशीब बदलले. व्यवसायातून एवढा फायदा होत नव्हता. दुसरे महायुद्धही संपले होते. यामुळे Willys Overland Corporation च्या जीपची मागणी घटली होती. यामुळे या कंपनीने सामान्यांना उरलेल्या जीप गाड्या विकण्यास सुरुवात केली.

याची खबर महिंद्रा यांना लागली. दोघेही बंधुराज अमेरिकेत पोहोचले. तिथे त्यांनी Willy ची जीप भारतात आयात करण्याची डील केली. 1949 याची सुरुवात झाली, यानंतर १० वर्षांनी महिंद्रांनी या जीप भारतातच बनविणाचे लायसन मिळविले. झाले असे की भारतात उत्पादन सुरु झाल्याने कारची किंमत कमी झाली आणि बघता बघता भारतीय रस्त्यावर एकूण वाहनांच्या २५ टक्के जीप धावू लागल्या.

जीपनंतर महिंद्राने अमेरिकेच्या इंटरनेशनल हार्वेस्टर कंपनीसोबत मिळून ट्रॅक्टर बनविण्याचे काम सुरु केले. याचसोबत शेतीसाठी वापरता येणारी यंत्रे, हत्यारे बनविण्यास सुरुवात केली. २० वर्षांतच महिंद्रा जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माता बनली. १९८३ पासून महिंद्रा या पदावर आहे. जगातील ५० हून अधिक देशांमध्ये ट्रॅक्टर विकले जातात.

जीपपेक्षा ट्रॅक्टरने महिंद्राचे नाव घराघरात पोहोचविले. यानंतर १९९० मध्ये महिंद्राने आणखी एक पाऊल टाकले. एसयुव्ही बनविण्यास सुरुवात केली. तेव्हा भारतीय बाजारावर मारुती आणि ह्युंदाईने कब्जा करण्यास सुरुवात केली होती. २००० मध्ये महिंद्राची पहिली एसयुव्ही बोलेरो आली. बास तेव्हापासून महिंद्राचे भारतातील एसयुव्ही बाजारावर वर्चस्व आहे.

महिंद्राचे व्यवसाय साम्राज्य फक्त जीप, ट्रॅक्टर किंवा SUV बनवण्यापुरते मर्यादित राहिले नाही. डिसेंबर 2009 मध्ये, महिंद्राने एअरवन बनवणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये भागभांडवल विकत घेतले. आज ऑस्ट्रेलियामध्ये कंपनीच्या २०० हून अधिक एअरवन 8 आहेत. जंगलातील आग विझवण्यासाठी, माणसे आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी या आकाशातील एसयुव्हींचा वापर केला जातो.

महिंद्राकडे इलेक्ट्रिक कारसाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आहेत. एक दशकापूर्वी REVAi इलेक्ट्रिक कार कंपनी विकत घेतील होती. चेतन मैनी यांनी 1994 मध्ये ही कंपनी सुरु केली होती. रेवा 2001 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि ती तेव्हाच्या काळापेक्षा खूप पुढे होती. महिंद्राने ही कंपनी २०१० मध्ये विकत घेतली. त्यानंतर 26 देशांमध्ये त्याची विक्री करण्यात आली परंतु चार्जिंग समस्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे बाजारात विक्री कमी झाली व नंतर बंद झाली.