अहमदनगरच्या के के रेंजवर रंगला युद्ध सरावाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:18 PM2019-02-11T12:18:40+5:302019-02-11T12:22:58+5:30

लष्काराचे टेहळणी हेलिकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगर जवळील के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला. 

के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर सोमवारी (11 फेब्रुवारी) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला.

मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही. व्ही. सुब्रमन्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्मड कॉर्प्स सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्यावतीने हे युद्ध सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले. 

युद्ध प्रात्यक्षिक दोन भागात झाले. पहिल्या भागात इंफॅन्टरीची कॉम्बऍक्ट वाहने व युद्धात वापरली जाणारी अद्ययावत हेलिकॉप्टर यांच्या ताकदीचे प्रदर्शन दाखवण्यात आले.

दुसऱ्या भागात शत्रूवर वेगवान पद्धतीने हल्ला करून जोरदार गोळीबार करण्यात आला. यामध्ये रणगाड्यांवरून तोफांचा मारा, बॉम्ब वर्षाव करण्यात आला. लष्करी प्रात्यक्षिकात रणगाडे मुख्य आरक्षण होते.

रणगाड्यांमधून आगीचे लोळ सोडत काही क्षणात शत्रूला भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. कानठळ्या बसविणाऱ्या तोफा रणगाड्यांमधून आगीचा लोळ ओकत बाहेर पडताच उपस्थितांचा थरकाप उडाला.