यंदाचा श्रावण महिना २९ दिवसांचा; मंदिरात भाविकांना प्रवेश मिळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:52+5:302021-07-16T04:13:52+5:30
व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. या महिन्यात प्रत्येक सोमवारी शिव मंदिरांमध्ये पूजा, अर्चा आणि इतर धार्मिक कार्यक्रम ...

यंदाचा श्रावण महिना २९ दिवसांचा; मंदिरात भाविकांना प्रवेश मिळणार का?
व्रतवैकल्याचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. या महिन्यात प्रत्येक सोमवारी शिव मंदिरांमध्ये पूजा, अर्चा आणि इतर धार्मिक कार्यक्रम होतात. या काळात प्रसाद, बेल, फुले आणि इतर साहित्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. तसेच प्रत्येक शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांनाही मर्यादा येण्याची शक्यता आहे.
मंदिर परिसरात विविध साहित्यांची विक्री करणाऱ्या लघू व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. त्यामुळे शासन यावर्षी तरी मंदिरे सुरू करण्याविषयी निर्णय घेणार आहे की नाही? असा सवाल भाविकांतून उपस्थित केला जात आहे. सध्या तरी भाविक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरवर्षी श्रावण महिन्यात शहरातील पारदेश्वर मंदिर येथे फुले, बेल आदी साहित्याची विक्री करतो. मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात अधिक असते. त्यामुळे सहाजिकच मोठा व्यवसाय होतो. सर्वसाधारपणे दुप्पट व्यवसाय या काळात होतो. यावर्षी मात्र अडचण आहे.
- रामा लंगोटे
श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानेही आमच्या व्यवसायाची उलाढाल वाढते. मात्र यावर्षी मंदिरे सुरु करण्याची परवानगी नसल्याने श्रावण महिन्यात हा व्यवसाय होतो की नाही याची चिंता आतापासूनच लागली आहे.
- राजू दुधारे
२५ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. २९ दिवसांच्या या महिन्यात चार श्रावणी सोमवार असून, या प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातील शिवालये भाविकांनी गजबजतात. राज्य शासनाने अजूनही मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली नसल्याने जिल्ह्यातील शिवालयांसह इतर मंदिरांमध्ये सध्या तरी शुकशुकाट पहावयास मिळत आहे.