कामगारांना लॉकडाऊनची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:50+5:302021-04-14T04:15:50+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ...

कामगारांना लॉकडाऊनची तर उद्योजकांना कामगार गावी जाण्याची चिंता
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील परप्रांतीय कामगारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय ठप्प होण्याची धास्ती उद्योजकांमध्ये आहे.
परभणी जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागण्याची चिन्हे असून, या शक्यतेमुळे कामगारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. जिल्ह्यात विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आदी भागातील कामगार परभणीत रोजगारासाठी आले आहेत. लॉकडाऊन लागल्यास अडकून पडण्याची भीती असल्याने या कामगारांमध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वी गावाकडे परत जाण्याची तयारी काही जणांनी केली आहे. एकदा कामगार गावाकडे परतला की उद्योग-व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे उद्योजकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांचे लॉकडाऊन असले तरी कामगार गावाकडून परत येणे, व्यवसाय पूर्वपदावर येणे यासाठी मोठा कालावधी लागणार असल्याने उद्योजकांना लॉकडाऊनची सर्वाधिक झळ सहन करावी लागणार आहे. येथील एमआयडीसी इतर औद्योगिक व्यवसायात यामुळेच चलबिचल निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला व्यवसाय कसातरी पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याने उद्योजक मंडळी देखील चिंतेत आहेत. काही जणांनी कामगारांच्या राहण्याची सुविधा करून त्यांना येथेच राहावे, अशी विनंती केली आहे; परंतु ही बाब सर्वांना शक्य नाही. त्यामुळे लॉकडाऊनची चिंता कामगारांबरोबर उद्योजकांमध्ये ही वाढू लागली आहे.