मानवत : तालुक्यातील कोल्हा सर्कलमधील नऊ गावांतील सिंचन विहिरींच्या कामाला वर्कऑर्डर मिळत नसल्याने पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सदस्य बंडू मुळे यांनी २३ मार्च रोजी दिला होता. पंचायत समिती कार्यालयाने दखल घेत कोल्हा सर्कलमधील विविध गावांतील १३ सिंचन विहिरींच्या सायंकाळी ५ वाजता वर्कऑर्डर दिल्या असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी सुहास कोरेगाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कोल्हा सर्कलमधील इरळद, मानोली, करंजी, मंगरूळ (पा.प), कोल्हा, अटोळा, नरळद, मानवतरोड या नऊ गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी सिंचन विहिरींचा लाभ मिळावा यासाठी एक वर्षभरापूर्वी पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळूनही विहिरीचे काम सुरू करण्यासाठी वर्कऑर्डर देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडून वर्षभरापासून अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत २३ मार्च रोजी संतप्त झालेल्या पंचायत समिती सदस्य बंडू मुळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत वर्कऑर्डर न मिळाल्यास पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता. या पत्राची पंचायत समिती कार्यालयाने तातडीने दखल घेतली. प्रलंबित असलेल्या ७९ सिंचन विहिरींपैकी १३ विहिरींच्या कामांना २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वर्कऑर्डर दिल्या आहेत. उर्वरित ६६ विहिरींचे प्रस्ताव तपासून यासंदर्भातील सर्व कार्यवाही पूर्ण करून येत्या आठवड्याभरात सिंचन विहिरीच्या कामाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी यांनी दिली.