हातभट्टी विकणारी महिला पोलिसांना पाहून पळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST2021-04-20T04:18:08+5:302021-04-20T04:18:08+5:30
जिल्ह्यात संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्याने दारू पिणाऱ्यांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांचा कल ...

हातभट्टी विकणारी महिला पोलिसांना पाहून पळाली
जिल्ह्यात संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यात दारूची दुकानेही बंद असल्याने दारू पिणाऱ्यांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांचा कल हातभट्टी दारूकडे वाढला आहे. ग्रामीण भागात ही हातभट्टी जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातील वडगाव सुक्रे येथे एक महिला हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती या भागात गस्तीवर असलेल्या दैठणा पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी रमेश धोंडगे यांनी सोबतच्या ३ कर्मचाऱ्यांसह वडगाव सुक्रे येथे राधाबाई रघुनाथ काळे या महिलेच्या घरावर १७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांनी या महिलेची चौकशी केली. त्यानंतर या महिलेच्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली पोलिसांना हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी १ हजार रुपयांचे हे साहित्य जप्त केले. यावेळी पोलीस कर्मचारी पंचनाम्यात व्यस्त असताना या महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर ही महिला पोलिसांना सापडली नाही. याबाबत पोलीस कर्मचारी रमेश धोंडगे यांनी दैठणा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी राधाबाई रघुनाथ काळे या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.