आरक्षण पेचामुळे गावचा कारभारी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:25+5:302021-02-05T06:05:25+5:30
पालम: तालुक्यातील तीन गावांत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी सोडण्यात आले आहे. या गावात या प्रवर्गातील महिला सदस्य ...

आरक्षण पेचामुळे गावचा कारभारी कोण?
पालम: तालुक्यातील तीन गावांत सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी सोडण्यात आले आहे. या गावात या प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने पेच निर्माण झाला असून गावाचा कारभारी कोण? असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून गावात वाद वाढत आहेत.
पालम तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी २५ जानेवारी रोजी आरक्षण सोडत झाली. तसेच ८ ते १३ फेब्रुवारीदरम्यान सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पेठशिवणी, फळा व उक्कडगाव या तीन गावांत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी चिठ्ठी काढून आरक्षण सोडले गेले ; परंतु, या गावात नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकही महिला ग्रामपंचायत सदस्याचा समावेश नाही. त्यामुळे सरपंचपदाचा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही गटात या मुद्यावरून राजकारण तापले आहे. गावात एक गट आरक्षण बदलाची तर विरोधी गट सुटलेले आरक्षण कायम रहावे, यासाठी धडपड करीत असून गावात -गावात वाद निर्माण होत आहेत. या पेचावर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. सरपंच व उपसरपंच निवडीची तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गावातील मतदारांनी मताचा कौल दिला असला तरीही सोडतचिठ्ठीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आमचं काय चुकलं, आरक्षण सोडताना शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होते, आमच्या मताचा अनादर केला जात असल्याचे गावातील मतदार भावना व्यक्त करीत आहेत. एवढा पेच निर्माण होऊनही प्रशासकीय पातळीवर कोणत्याही हालचाली होत नसल्याने तीन गावांचा कारभारी कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.