शेतात फवारणी करताना अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:46 IST2024-07-08T15:46:22+5:302024-07-08T15:46:33+5:30
उसाच्या पिकावर फवारणी करताना अचानक शेताच्या वरून गेलेली विद्युत तार तुटली

शेतात फवारणी करताना अचानक विद्युत तार तुटून अंगावर पडली, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील इटाळी शिवारात शेतात फवारणी करणाऱ्या मुंजा लक्ष्मण काळे (३५) या शेतकऱ्याचा अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना ७ जुलै रोजी दुपारी एक वाजता घडली.
ईटाळी येथील काळे हे आपल्या शेतात उसाच्या पिकावर फवारणी करताना अचानक शेताच्या वरून गेलेली विद्युत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. यात त्यांना जोराचा विजेचा शाॅक लागून ते जखमी झाले. त्यांना पाथरी येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, जमादार भारत नलावडे, सुनील बावरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी साडेपाच वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, भाऊ असा परिवार आहे. बाळू लक्ष्मणराव काळे यांच्या माहितीवरून पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार भारत नलावडे करीत आहेत.