दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू
By मारोती जुंबडे | Updated: April 10, 2023 17:49 IST2023-04-10T17:47:32+5:302023-04-10T17:49:22+5:30
भारस्वडा येथील घटना; परमिट घेऊनही बसला धक्का

दुरुस्ती करत असताना अचानक विजेचा सुरु झाला; कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू
दैठणा (परभणी) : विद्यूत रोहित्रावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने विजेचा जोरदार धक्का लागून कंत्राटी लाईनमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना परभणी तालुक्यातील भारस्वाडा येथे १० एप्रिल रोजी सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास घडली. तात्याराव विठ्ठलराव सुरवसे (४५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या कारभाराबद्दल मृताच्या नातेवाईकाने संताप व्यक्त केला.
परभणी तालुक्यातील भारसवाडा येथील तात्याराव विठ्ठलराव सुरवसे (४५) हे महावितरण मध्ये मागील दहा ते बारा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने लाईनमनचे काम करतात. भारस्वाडा परिसरात रविवारी रात्री १० पासून वीजपुरवठा बंद असल्यामुळे गावापासून एक किमी अंतरावर ब्रह्मपुरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून वीज पुरवठा बंदचे अधिकृत परमिट घेऊन रोहित्र दुरुस्तीचे काम करत होते. मात्र काम करतेवेळी अचानक विजेचा जोरदार धक्का बसल्याने तात्याराव सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच दैठणा येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे अभियंता माहीम यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच दैठणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पीएसआय संजय वळसे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, मयत तात्याराव सुरवसे यांना दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे.