- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी) : यश मिळवायचं असेल तर परिस्थितीचं भांडवल न करता त्याच्यासोबत संघर्ष करावा लागतो. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न साकार करता येतात. याचाच प्रत्यय पाथरी शहरातील लहुजी कॉलनी येथील एका विधवा ऊसतोड मजुर महिलेच्या मुलीने दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत राहिल्याने अखेर यश मिळत आरती हिवाळे हीची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सध्या ती आई सोबत ऊसतोडणीचे काम करत आहे. इथेच निवड झाल्याचे समजताच तिचा आनंद गगनात मावत नव्हता. कुटुंबाच्या कष्टांना योग्य न्याय दिला आहे.
लहुजी कॉलनी येथील नंदा भागवत हिवाळे या ऊसतोड कामगार असून, १५ वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार त्यांच्यावर आला. दोन मुले आणि एक मुलगी यांचा सांभाळ करताना त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. मात्र, त्यांच्या मुलीने आरतीने या संघर्षाला सकारात्मक दिशा देत आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठं यश मिळवलं. लहानपणापासून परिस्थितीच्या चटक्यांना सामोरी जात असताना तिने आईच्या कष्टांना वाया जाऊ दिलं नाही. ऊसतोडणीच्या कामांसोबतच शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि अखेर तिची निवड मुंबई पोलीस दलात झाली.
आरतीने प्राथमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय देवनांदरा येथे पूर्ण केले, तर उच्च माध्यमिक शिक्षण सौ. शांताबाई विद्यालय, पाथरी येथे घेतले. महाविद्यालयीन शिक्षण स्व. नितीन महाविद्यालयात पूर्ण झाल्यानंतर ती सध्या शिवाजी महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
ऊसतोडणी करताना निवड झाल्याचे समजलेसध्या तिची आई आणि ती सायखेडा साखर कारखान्याच्या वतीने केदारवस्ती येथे ऊसतोडणीचे काम करत आहेत. पोलीस भरतीच्या निवड यादीत आपले नाव पाहताच ऊसाच्या फडात असतानाच आरतीचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ऊसाच्या फडावरच शाहीर चंद्रकांत हिवाळे, राहुल कांबळे, अनिकेत साठे यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी आरती हिवाळे, तिची आई नंदा हिवाळे, तसेच तिचे चुलते लहू हिवाळे उपस्थित होते. आरती हिवाळे हिच्या जिद्दीने आणि संघर्षाने अनेकांना प्रेरणा मिळेल, हे निश्चित!