लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात तरुणांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची चिंता आता वाढली आहे. तरुण मंडळी घराबाहेर फिरत असल्याने त्यांचे लसीकरण आधी केले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
दिनांक १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, अवघे दोन ते तीन दिवस लसीकरण चालले आणि त्यानंतर या वयोगटासाठीचे लसीकरण बंद आहे. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून, त्यांनाही लस कमी पडत आहे. तरुण मंडळी घराबाहेर फिरतात. सार्वजनिक ठिकाणी कामानिमित्त त्यांना जावे लागते. अशावेळी या तरुणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे तरुणांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, राज्य शासनाने या वयोगटाकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण झाले खरे; परंतु तरुणांनाच लस मिळाली नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाला लस कधी मिळणार? अशी चिंता आता ज्येष्ठ नागरिकांना सतावत आहे. तेव्हा राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटासाठी लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मी आणि माझ्या पतीने कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. विशेष म्हणजे, आम्ही लसीचे दोन्ही डोस घेतल्याने कोरोनापासून सुरक्षित झालो आहोत; परंतु आम्ही घराबाहेर पडत नाही. आमचा मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यांना लस मिळाली नसल्याने काळजी वाटते.
- लताबाई जोशी, परभणी
आम्हाला लस मिळाल्याचे समाधान आहे; परंतु मुलाचे लसीकरण झालेले नाही. ज्याकाळात लस उपलब्ध झाली, त्यावेळी ऑनलाईन नोंदणी करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, नोंदणी झाली नाही. त्यामुळे मुलाचे लसीकरण रखडले आहे. त्याला लवकरात लवकर लस मिळावी, अशी अपेक्षा आहे.
आम्हाला मिळाली असली तरी मुलांचे लसीकरण झालेले नाही. मुलगा आणि सून दोघेही नोकरीला आहेत. त्यांना दररोज कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते, त्यामुळे काळजी वाटते. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू करणे गरजेचे आहे.