किती हा पोरखेळ! परभणीत सलग दुसऱ्या दिवशी बीएड सीईटीचा पेपर रद्द; विद्यार्थी संभ्रमात
By मारोती जुंबडे | Updated: March 28, 2026 15:54 IST2026-03-28T15:53:54+5:302026-03-28T15:54:56+5:30
बीएड सीईटी पेपर रद्द; संतप्त विद्यार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव, चौकशीची मागणी

किती हा पोरखेळ! परभणीत सलग दुसऱ्या दिवशी बीएड सीईटीचा पेपर रद्द; विद्यार्थी संभ्रमात
परभणी: शहरातील एमआयडीसी परिसरातील एमजीएम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बीएड सीईटी परीक्षेदरम्यान सलग दुसऱ्या दिवशीही मोठा गोंधळ उडाला. तांत्रिक अडचणींमुळे शनिवारीदेखील ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. शुक्रवारी झालेल्या गोंधळानंतर शनिवारी तरी नियोजन सुरळीत होईल, ही विद्यार्थ्यांची अपेक्षा फोल ठरल्याने उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे २००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले असून, परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक बिघाड
ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी आवश्यक संगणक यंत्रणा आणि तांत्रिक तयारी अपुरी असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे काही संगणक बंद पडल्याचे सांगण्यात आले होते. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांनी केंद्रावर मोठी गर्दी केली होती, मात्र सलग दुसऱ्या दिवशीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने अखेर पेपर रद्द करण्यात आला. भर उन्हात लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना आल्यापावली माघारी जावे लागल्याने ही परीक्षा नसून भविष्याशी सुरू असलेला पोरखेळ असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
संतप्त विद्यार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडे धाव
पहिल्या दिवशीच्या गैरसोयीनंतर जिल्हा प्रशासनाने सूचना देऊनही परिस्थिती न सुधारल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. सुमारे २००० विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. यामध्ये रमेश तोर, रेखा धबाले, वैष्णवी रोकडे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी केंद्राच्या निवडीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या केंद्राची निवड कोणी केली आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला जबाबदार कोण, असा सवाल या निवेदनात करण्यात आला आहे.
पुढील तारीख मिळेना; विद्यार्थी संभ्रमात
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) संबंधित केंद्र तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या केंद्रावरील परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून नवीन तारीख, वेळ आणि केंद्राची माहिती उमेदवारांना ई-मेल व मोबाईलद्वारे कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, नेमकी परीक्षा कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.