पाणीच पाणी चोहिकडे

By Admin | Updated: September 1, 2014 00:26 IST2014-09-01T00:05:26+5:302014-09-01T00:26:39+5:30

परभणी: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील दोन दिवस परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Watering the water with water | पाणीच पाणी चोहिकडे

पाणीच पाणी चोहिकडे

परभणी: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील दोन दिवस परभणी जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील जलसाठ्यात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे नदी-नाले एक झाले. गोदावरी नदी प्रवाही झाली. ढालेगाव, मुद्गल येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढला. निम्न दुधना प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. अपवाद आहे, तो येलदरी धरणाचा. येलदरी धरण मात्र तहानलेलेच आहे. सर्वत्र झालेल्या पावसामुळे पीक परिस्थितीत झपाट्याने बदल होत आहे. दोन दिवस जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नाही.
पाथरी तालुक्यात पावसाचे थैमान
पाथरी : दोन दिवसांपासूून तालुक्यामध्ये संततधार पाऊस पडत राहिल्याने यावर्षी प्रथमच पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना पूर आला. रस्ते बंद पडले तर शहरातही अनेक ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. तर काही गावांमध्ये पुराचे पाणी घरात घुसल्याची घटना घडली. रेणापूर पुलाच्या दोन्ही बाजूने पाणी वाहिल्याने तब्बल ६ तास वाहतूक खोळंबली होती.
२९ आॅगस्ट रोजी तालुक्यात पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर तब्बल २४ तास संततधार पाऊस पडत राहिला.
३१ आॅगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पाऊस चालूच होता. या पावसामुळे मागील दोन दिवस जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. देवेगाव, खेर्डा येथील घरात पाणी घुसले तर वडी गावाच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. पाथरी शहरातील इंदिरानगरातील काही घरात पाणी शिरले. नदी- नाले तुडूंब भरुन वाहू लागल्याने दोन दिवस नागरिकांना गावाबाहेर पडताही आले नाही. ३१ आॅगस्ट रोजीच्या नोंदीप्रमाणे तालुक्यामध्ये ४७ मि.मी. पाऊस झाला. तर रविवारी दिवसभरात पडलेला पाऊस ७५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. तालुक्यात आतापर्यंत ३७७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. मुद्गल बंधाऱ्यात ५ टक्के पाणी वाढले तर ढालेगाव बंधाऱ्यात केवळ २ टक्के पाणीसाठा वाढला.
वाघाळा येथील वार्ताहराने कळविले की, सततच्या पावसामुळे बाभळगाव महसूल मंडळातील लिंबा, मुद्गल, पिंपळगाव, विटा, फुलारवाडी या गावात पाणीच पाणी झाले होते. राज्य रस्ता क्रमांक ४४ वर वाहतूक ठप्प झाली होती.
सोनपेठ तालुक्यात ५८ मिमी पाऊस
सोनपेठ : तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वदूर पाऊस झाला़ या पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे़ पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात आनंदी वातावरण आहे़ झालेल्या पावसाची नोंद सरासरी ५८ मिमी झाली आहे़
तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेत होता़ खरीप हंगामातील पीक पेरणीनंतर पाऊस झाला नाही़ त्यामुळे दुपारच्या उन्हात सोयाबीन हे पीक कोमेजून जाण्याच्या अवस्थेत दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेताकडे फिरकणे बंद केले होते़ कापूस व तूर या पिकांची वाढ खुंटली होती़ शेतकऱ्यांनी शेतातील अंतर मशागत पूर्ण करून बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटला होता़ पाऊस येत नसल्याने बाजारपेठेतही त्याचा विपरित परिणाम झाला होता़ बाजारातील देणे-घेणेही बंद झाले होते़
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते़ परंतु, गेल्या चोवीस तासांत सोनपेठ परिसरात ५६ मिमी तर तालुक्यातील आवलगाव परिसरात ६० मिमी पावसाची नोंद झाली़ पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात समाधानाचे वातवरण असून, कापूस पिकाला शेतकरी आता खत देण्यास सुरुवात करणार आहेत़ (वार्ताहर)
रस्ता गेला वाहून
रेणापूर गावाजवळून जाणाऱ्या पुलाचे बांधकाम उंची वाढवून करण्यात आले. दोन्ही बाजूने ५०० मीटर भराव करण्यात आल्याने पुराचे पाणी पुलाच्या बाजूने गेल्याने वाहतूक सकाळी ११ वाजेपासून बंद राहिली. ५०० मीटरपेक्षा अधिक अंतरावर पाणी पोहचले. लोकसहभागातून तयार करण्यात आलेला रस्ता या पुलात वाहून गेला. पुरामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती माजी सरपंच शंतनू पाटील यांनी दिली. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीक्षमता १४.८७ दलघमी एवढी असून हा पाऊस पडण्यापूर्वी या बंधाऱ्यात १.५६ दलघमी पाणीसाठा शिल्लक होता. तीन दिवसात ढालेगाव बंधाऱ्यात ४३.१७ टक्के पाणीसाठा वाढला. यामुळे या बंधाऱ्यात ७.७९ दलघमी पाणीसाठा झाला.तर मुद्गल बंधाऱ्यात ७.३८ टक्के वाढ झाली आहे.
दुधना प्रकल्पात ४ टक्क्यांनी वाढ
सेलू : रविवारी पहाटे ४ वाजता सुरु झालेल्या संततधार पावसाने छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आला तर कसुरा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहिली.
सेलू- पाथरी मार्गावर बोरगावजवळ नाल्याला पूर आल्यामुळे काही काळ पाथरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर कसुरा नदीच्या पुलावरुन पाणी वाहिले. परभणी मार्गावरुन कसुरा नदी दुथडी भरुन वाहिल्यामुळे रविवारी उशिरा वाहतुकीची समस्या निर्माण झाली. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील ओढ्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. शहरातही दमदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान, दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत राहिल्याने जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. पावसामुळे अनेक बसफेऱ्या महामंडळाने रद्द केल्या तर काही ठिकाणी ओढ्यांना पूर आल्यामुळे बसफेऱ्यांवर परिणाम झाला. (प्रतिनिधी)
दुधनात ४ टक्के पाणीवाढ
जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात २४ तासांत तब्बल ४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात वेगाने जलसाठा झाला. दुधना प्रकल्पात रविवारी ५९ टक्के पाणीसाठा होता. त्यात ४१ टक्के जीवंत पाणीसाठा आहे. संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

Web Title: Watering the water with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.