रस्त्यासाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 06:28 PM2019-08-21T18:28:12+5:302019-08-21T18:29:18+5:30

राणीसावरगाव ते रेवा तांडा रस्त्याची दयनीय अवस्था

Warning to boycott Assembly elections for the road in Parabhani | रस्त्यासाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

रस्त्यासाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Next
ठळक मुद्दे३० दिवसांत रस्त्याचे काम करण्याची मागणी

परभणी : वारंवार पाठपुरावा करूनही राणीसावरगाव ते रेवा तांडा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने पालम आणि गंगाखेड तालुक्यातील सहा गावांमधील ग्रामस्थांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

पालम तालुक्यातील रेवातांडा, गंगाखेड तालुक्यातील कुंडगीरवाडी, चंदू नाईक तांडा, सोमला नाईक तांडा, थावरु नाईक तांडा या ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जाणारा हा एकमेव रस्ता असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता खराब असल्याने वरील सर्व गावांची बस सेवा बंद आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रस्त्याअभावी रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. सहा किलोमीटर अंतराचा हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी ग्रामस्थांनी गंगाखेड तसेच पालम तहसील कार्यालयात अनेकवेळा निवेदने दिली. विशेष म्हणजे, तीनही ग्रामपंचायतींनी रस्ता दुरुस्त करण्याचा ठराव घेतला आहे. असे असताना रस्ता दुरुस्त होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी तीनही ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गावांतील सुमारे दोनशे ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांना रस्त्याची अवस्था नमूद केली आहे. ३० दिवसांत रस्त्याचे काम झाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांचीही भेट घेऊन त्यांना रस्त्याच्या प्रश्नी साकडे घातले.

Web Title: Warning to boycott Assembly elections for the road in Parabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.