चर्चेतील वालूरची ऐतिहासिक बारव आता चिंतेचा विषय; संवर्धन समितीची एकही बैठक नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:29 IST2025-03-08T17:28:21+5:302025-03-08T17:29:31+5:30
वालूर येथील बारव तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून गाळ, झुडपे काढून बारव पुनर्जिवित केली. या उत्खननात हेलीकल स्टेपवेल (चक्राकार) बारावचा ऐतिहासिक आणि शिल्प केलेचा उत्कृष्ठ नमुना पुढे आला.

चर्चेतील वालूरची ऐतिहासिक बारव आता चिंतेचा विषय; संवर्धन समितीची एकही बैठक नाही
- राहूल खपले
वालूर (परभणी) : जगप्रसिद्ध हेलीकल स्टेपवेल म्हणून सेलू तालूक्यातील वालूर येथील बारव प्रसिद्ध आहे. तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी श्रमदान करून बारवेला पुनरर्जिवीत केले. एक अनोखे आणि विरळ स्टेपवेलची दखल पुरातत्व विभाग, शासन, पर्यटकांकडून घेण्यात आली. या काळात शासनाने उदो उदो करीत वालूर येथील या बारवेला कागदी महत्त्व देऊन प्रसिद्धी दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही दोन-तीन वर्षांत तातडीने भेटी दिल्या. बारवाचे सर्वांनी तोंडभर कौतुक केले. परंतु सर्वांना या बारवेचा संवर्धनाचा आता विसर पडल्याची स्थिती दिसून येत आहे.
वालूर येथील बारव तीन वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेतून गाळ, झुडपे काढून बारव पुनर्जिवित केली. या उत्खननात हेलीकल स्टेपवेल (चक्राकार) बारावचा ऐतिहासिक आणि शिल्प केलेचा उत्कृष्ठ नमुना पुढे आला. त्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक, अभ्यासक भेट देण्यासाठी येत आहेत. मात्र, येथील ऐतिहासीक आणि शिल्पकलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून ओळख असलेल्या स्टेपवेलची दूरावस्था पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. मागील तीन वर्षाच्या काळात जिल्ह्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारवेला भेट देऊन प्रशंसा केली. मात्र,याकडे त्यांचेही दुर्लक्षच झाले. हा ऐतिहासीक वारसा जतनासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
पोस्टाच्या तिकीटावर छायाचित्र प्रसिद्ध
सुंदर आणि गोलाकार असलेल्या बारवेचे छायाचित्र शासनाने पोस्टाच्या तिकीटावर प्रसिद्ध केले. तात्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गावकऱ्यांची निस्वार्थ कामगिरीची स्तुती करुन त्यांना प्रमाणपत्र दिले. बारव स्वच्छताची प्रेरणा घेऊन जिल्हातील ५२ पुरातन बारावासाठी 'बारव स्वच्छता आभियान' जिल्हाप्रशासनांनी हाती घेतले होते. मात्र, त्यानंतर संवर्धन संरक्षणाचा विसर पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील बारवेची ब्रँड अँबेसिडर
एक हजार वर्षाचा इतिहास लाभलेल्या वालूर येथील चक्राकार बारवेचा महाराष्ट्रातील बारवेची ब्रँड अँबेसिडर म्हणून उल्लेख केलेला आहे. सद्यस्थितीत या बारवेच्या पायऱ्या खिळखिळ्या झाल्या आहे. शासनाने ऐतिहासीक ठेवा संवर्धनासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी गोपीकिशन दायमा यांनी केली.
अद्याप एकही बैठकही नाही
अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वालूरची बारव चर्चेचा नाही तर चिंतेचा विषय बनत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्राचिन वास्तू संवर्धन समितीची स्थापना झाली आहे. परंतू त्याची अद्याप एकही बैठकही झालेली नाही. केवळ कागदावरच दिसून येत आहे.
- मल्हारीकांत देशमुख, बारव संवर्धन समिती सदस्य, परभणी