१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज १०० कॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:15 IST2021-04-19T04:15:41+5:302021-04-19T04:15:41+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत ...

१०८ रुग्णवाहिकेसाठी वेटिंग; दररोज १०० कॉल्स
परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दररोज या रुग्णवाहिकांना १०० पेक्षा अधिक कॉल्स येत आहेत. या रुग्णांना सेवा देताना या रुग्णवाहिका चालकांची दमछाक होताना दिसून येत आहे.
आपतकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपचार मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहेत. जिल्ह्यातील १३ रुग्णवाहिकांना दिवसभरात १०० हून अधिक कॉल्स येत आहेत.
कॉल केल्यानंतर शहरात २० मिनिटांत तर ग्रामीणमध्ये तासात
कोरोनासह इतर रुग्णांनी १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या १३ रुग्णवाहिकांपैकी एक रुग्णवाहिका शहरात २० मिनिटांत, तर ग्रामीण भागात तासाभरात रुग्णांना सेवा देण्यासाठी उपलब्ध होते.
सद्य:स्थितीत १०८ क्रमांकाच्या केवळ १३ रुग्णवाहिका जिल्ह्यात उपलब्ध आहेत. मात्र, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कोरोना रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
रुग्णांनाही मोफत व ऑक्सिजनयुक्त सेवा दवाखान्यापर्यंत मिळत असल्याने रुग्णांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या रुग्णवाहिका वाढविणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागातून रुग्णवाहिकेला मागणी
शहरापाठोपाठ आता आपतकालीन स्थितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रुग्णवाहिकेला ग्रामीण भागातूनही मोठी मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ४० टक्के कॉल्स हे ग्रामीण भागातून येत आहेत.