परभणी : जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने एरंडेश्वर (ता. पूर्णा), शेळगाव (ता. सोनपेठ), आर्वी (ता. परभणी), चिकलठाणा (ता. सेलू), मरडसगाव (ता. गंगाखेड) आणि बनवस (ता. पालम) या ठिकाणी आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, आरोग्य केंद्रांचे इमारत बांधकामही पूर्ण झाले आहे; परंतु त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची पदे मंजूर नसल्याने आरोग्यसेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागापर्यंत पसरलेला आहे. तेव्हा या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य साहाय्यक, आरोग्य साहाय्यिका, कनिष्ठ सहायक आणि सेवक या पदांना मंजुरी द्यावी, अशी मागणी राजेश विटेकर यांनी केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाल्यास या भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षमपणे राबविणे शक्य होणार आहे. या उद्देशाने विटेकर यांनी ही मागणी केली आहे.
लसीचा पुरवठा वाढवा
जिल्ह्यात १० लाख कोरोना प्रतिबंधक लसीची आवश्यकता असताना केवळ पाच आणि १० हजार डोसेसचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिकेचे नागरी दवाखाने तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा करावा, अशी मागणीही विटेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.