Video : असे धाडस करू नका ! पुर असताना पुलावरून जीप घातली, चालक थोडक्यात बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 19:42 IST2021-07-15T19:35:09+5:302021-07-15T19:42:27+5:30
पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी वेगाने आले आणि चालकासह जीप प्रवाहासोबत वाहून गेली.

Video : असे धाडस करू नका ! पुर असताना पुलावरून जीप घातली, चालक थोडक्यात बचावला
कुपटा ( परभणी ) : पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना धाडस करून त्यात जीप घालणे चालकाच्या जीवावर बेतले होते. मात्र, प्रसंगावधान राखून चालकाने जीपबाहेर उडी घेत पोहत सुरक्षित स्थळ गाठून जीव वाचवला. हि घटना सेलू तालुक्यातील मौजे कुपटा येथे मंगळवारी ( डी. १३ ) रात्री घडली. धनंजय गोविंदराव सोळंके असे चालकाचे नाव असून दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने जीप बाहेर काढली.
पुर असताना पुलावरून जीप घातली, चालक थोडक्यात बचावला. परभणी जिल्ह्यातील कुपटा येथील घटना. pic.twitter.com/566m7f7nbE
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) July 15, 2021
सेलू तालुक्यातील मौजे कुपटा येथे मंगळवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. यामुळे गावालगतच्या ओढ्याला मोठा पुर आला. याचवेळी गावातील धनंजय गोविंदराव सोळंके हा आपल्या आईला बोरी येथून घरी घेऊन येण्यासाठी एकाची जीप ( MH 26 L 0353 ) घेऊन रात्री 9:30 वाजता निघाला होता. यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. गावाच्या बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यावर एक पुल असून त्यावरून पाणी वाहत होते. पुलावर धनंजय यांची गाडी अचानक बंद पडली. त्यांनी गाडी सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी वेगाने आले आणि चालकासह जीप प्रवाहासोबत वाहून गेली. धनंजय यांनी प्रसंगावधान राखत जीपमधून बाहेर उडी घेत पोहत सुरक्षित स्थळ गाठले. तर गाडी पुढे जाऊन अडकली. दरम्यान दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने जीपला बाहेर काढले. जीपचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.