पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पतीनेही सोडले प्राण
By राजन मगरुळकर | Updated: December 19, 2024 13:17 IST2024-12-19T13:16:37+5:302024-12-19T13:17:43+5:30
ही हृदयद्रावक घटना परभणी शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी भागात घडली.

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पतीनेही सोडले प्राण
परभणी : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर शिवाजीराव डावरे यांच्या पत्नी विमलबाई डावरे यांचे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने व आजारी असल्याने निधन झाले. या घटनेनंतर अवघ्या दोन तासात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ.शिवाजीराव डावरे यांनी सुद्धा त्यांचे प्राण सोडले. ही हृदयद्रावक घटना परभणी शहरातील स्वातंत्र्य सैनिक कॉलनी भागात घडली.
विमलबाई डावरे (८५) यांचे बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी निधन झाले. या घटनेनंतर साधारण दोन तासांनी डॉक्टर शिवाजीराव डावरे (९५) यांनी सुद्धा त्यांचे प्राण सोडले. डॉ. शिवाजीराव डावरे हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी विविध स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हा प्रशासन तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांना अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पुष्पचक्र अर्पण केले. त्यांच्या पार्थिवावर जिंतूर रोड भागातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. शिवाजीराव डावरे आणि विमलबाई डावरे यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. डॉ.शिवाजीराव डावरे यांच्यासह त्यांच्या पत्नी विमलबाई डावरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कॉलनीतील नागरिक, रहिवासी, महिला यांच्यासह विविध अधिकारी यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉलनी भागातील राहत्या घरी गर्दी केली होती.