अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्ष पदी गोरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:08+5:302021-04-07T04:18:08+5:30

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटाला ११, तर बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा ...

Varpudkar as President and Goregaonkar as Vice President | अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्ष पदी गोरेगावकर

अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्ष पदी गोरेगावकर

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटाला ११, तर बोर्डीकर यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या होत्या. एक जागेवर अपक्ष निवडून आला. त्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्षपदासाठी जे पॅनल आपणास पाठिंबा देईल, त्यांना आपले ४ सदस्य पाठिंबा देतील, अशी घोषणा केली. त्यामुळे बोर्डीकर गटाकडून सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली. पालमचे अपक्ष गणेशराव रोकडे हे बोर्डीकर गटाकडे गेल्याची व वरपूडकर गटातील भाजपचे बालाजी देसाई हेदेखील बोर्डीकर गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने वरपूडकर गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. वरपूडकरांनी मात्र राजकीय मुसद्देपणा दाखवत पडद्यामागे खेळी केली. दरम्यान, बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी ६ एप्रिल रोजी निवडणूक घोषित झाली. त्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी या निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगीची मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. परिणामी पॅनल प्रमुख बोर्डीकर यांना निवडणुकीत सहभागी होता येत नसल्याने या गटात अस्वस्थता निर्माण झाली. अगोदरच काठावरचे संख्यबळ आणि त्यात आणखी एक मत कमी झाल्याने काठावरील सदस्य वरपूडकर यांच्याकडे कायम राहिले. सोमवारी सकाळी ११ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. अध्यक्षपदासाठी आ. सुरेश वरपूडकर, प्रेरणा वरपूडकर यांचा, तर बोर्डीकर गटाकडून माजी खा. शिवाजी माने यांचा अर्ज दाखल झाला. तपासणीअंती माने यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे वरपूडकर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी वरपूडकर गटाकडून हिंगोलीतील शिवसेनेचे राजेश पाटील-गोरेगावकर, तर बोर्डीकर गटाकडून भगवानराव सानप यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी सानप यांनी त्यांचा अर्ज परत घेतला. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अध्यक्षपदी आ. वरपूडकर व उपाध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली. यावेळी २१ पैकी १८ संचालक उपस्थित होते. आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर व दत्तात्रय मायंदळे हे ३ संचालक गैरहजर होते. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांना कार्यालय अधीक्षक अब्दागिरे, बी. एस. नांदापूरकर, पठाण व माळवदकर यांनी सहकार्य केले.

बोर्डीकर प्रवेशद्वारावरून गेले

न्यायालयाच्या निर्णयाने बोर्डीकर यांना बॅंकेत येण्यास प्रतिबंध असला तरी दुपारी १२ वाजता ते एका कारने बॅंकेच्या समोरील रस्त्यावर आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने त्यांना यासंदर्भातील नोटीस दिली. ही नोटीस स्वीकारून ते वाहनातून न उतरताच निघून गेले.

दांडेगावकरांच्या बैठकीनंतर समीकरणे बदलली

आ. बाबाजानी दुर्राणी यांनी बोर्डेकर गटाकडून निवडणूक लढविली. त्यांनतर त्यांनी अध्यक्ष पदास जो गट पाठिंबा देईल, त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली होती. मंगळवारी सकाळी दांडेगावकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी पक्षाच्या चारही सदस्यांची बैठक घेतली. त्यात पक्षाने या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याने स्पष्ट केले. त्यामुळे आ. बाबाजानी दुर्राणी नाराज होऊन संचालक दत्तात्रय मायंदळे यांच्यासह पाथरीला निघून गेले.

राष्ट्रवादीचे आ. नवघरे, विटेकर, भाजपाचे रोकडे, देसाई वरपूडकरांसोबत

या प्रक्रियेत राष्ट्रवादीचे वसमतचे आ. राजू नवघरे व राजेश विटेकर यांनी सुरूवातीपासूनच वरपूडकरांची साथ दिली. मंगळवारीही ते त्यांच्यासमवेतच होते. शिवाय भाजपचे बालाजी देसाईदेखील वरपूडकर यांच्यासोबतच होते. पालमचे गणेश रोकडे हेही मंगळवारी वरपूडकर यांच्यामोबत दिसून आले.

ग्रमीण भागातील जनता व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून बॅंकेचे कामकाज चालविण्यात येईल. बॅंकेची आर्थिक संपन्नता वाढविताना खातेदारांना अधिक सोयी सुविधांसह उत्कृष्ट सेवा देण्यास आपले प्राधान्य राहील. सर्व सभासद, सोयायट्यांचे चेअरमन, बॅंकेचे संचालक यांच्या सहकार्यातून बॅंकेचे लोकाभिमुख कामकाज करण्यात येईल.

आ. सुरेश वरपूडकर

बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे संचालक निवडून आले आणि बॅंकेच्या सत्तेतही सहभाग मिळाला. शिवसेना यापुढेही सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुका लढवून शिवसैनिकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेताना खातेदारांनाही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहील.

आ. राहुल पाटील

Web Title: Varpudkar as President and Goregaonkar as Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.