परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST2021-04-07T04:18:02+5:302021-04-07T04:18:02+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ ...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर व प्रेरणा वरपूडकर यांचा आणि विरोधी बोर्डीकर गटाकडून हिंगोलीचे माजी खा. शिवाजी माने यांचा अर्ज दाखल झाला. छाननीत शिवाजी माने यांचा अर्ज अवैध ठरला तर निश्चित केलेल्या वेळेत अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज प्रेरणा वरपूडकर यांनी मागे घेतला. त्यामुळे आ. सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी वरपूडकर गटाकडून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे राजेश पाटील-गोरेगावकर तर बोर्डीकर गटाकडून भगवानराव सानप यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी सानप यांनी त्यांचा अर्ज परत घेतला. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अध्यक्षपदी आ. वरपूडकर व उपाध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांच्या भूमिकेने वातावरण पलटले
भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांना विमा घोटाळा प्रकरणात जिल्हा बँकेत जाण्यास न्यायालयाने एका आदेशान्वये बंदी घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगी मागणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बोर्डीकर यांनी दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे बोर्डीकर गटात सोमवारी निराशेचे वातावरण होते. काठावर असलेले संख्याबळ आणखी कमी झाल्याने मतांची जुळवाजुळव होणे, या गटास अशक्य वाटत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावरच या गटाची पूर्ण दारोमदार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली. दांडेगावकर यांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांची परभणीत बैठक घेतली तसेच पक्षाचे सर्व सदस्य महाविकास आघाडीसाेबतच राहतील, असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीस उपस्थित आ. दुर्राणी हे नाराज होऊन पाथरीला निघून गेले. परिणामी बोर्डीकर गटाचे बँकेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.