जिंतूर तालुक्यातील बोरी, कौसडी, दूधगाव, आसेगाव, निवळी, कोक या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक माध्यमिक शाळांसह उर्दू शाळा आहेत. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र मागील वर्षभरापासून बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसह कौसडी, दूधगाव, आसेगाव येथील राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर बोरी, निवळी व दूधगाव येथील केंद्रप्रमुख यांची पदे रिक्त आहेत. बोरी येथील उर्दू शाळेतील मुख्याध्यापकपदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकाकडे आहे. या रिक्त पदांमुळे शैक्षणिक कामाचा खोळंबा होत असून विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा मुख्याध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र या विभागाच्या उदासीन भूमिकेमुळे अद्यापही या शाळांना मुख्याध्यापक मिळाले नाहीत. त्यामुळे ८ मुख्याध्यापकांसह २ केंद्रप्रमुखांची पदे आजही रिक्त आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन तत्काळ ही पदे भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बोरी व परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. ही पदे लवकरच भरण्यात येतील.
अजय चौधरी, उपाध्यक्ष, जि.प. परभणी