चाकूचा धाक दाखवून महिलेचा मोबाईल चोरणारे दोघे ताब्यात
By राजन मगरुळकर | Updated: July 17, 2023 18:09 IST2023-07-17T18:05:32+5:302023-07-17T18:09:53+5:30
नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत एक महिला फोनवर बोलत जाताना घडली घटना

चाकूचा धाक दाखवून महिलेचा मोबाईल चोरणारे दोघे ताब्यात
परभणी : नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मोबाईल चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याच्या प्रकार घडला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखा व सायबर पथकाने केला. यात दोन आरोपींना पोलिसांनी निष्पन्न केले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत एक महिला फोनवर बोलत जाताना अज्ञात चोरट्याने तिच्या हातातील मोबाईल चाकूचा धाक दाखवून बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व सायबर पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. तपासअंती सदरचा गुन्हा हा आरोपी शेख नदीम उर्फ छोटू शेख सलीम (२८, रा.सावित्रीबाई फुले नगर, परभणी) व संतोष उर्फ खुब्या तुकाराम पाईकराव (२०, रा.शाहू नगर, परभणी) व इतर एक यांनी मिळून केल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी सदरील दोन आरोपींना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना नानलपेठ ठाण्यात तपासकामी हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पूयड, मारोती चव्हाण, व्यंकट कुसुमे, नागनाथ तुकडे, पोलीस कर्मचारी विलास सातपुते, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, मधुकर ढवळे, निकाळजे, सायबरचे बालाजी रेड्डी, गणेश कौैटकर यांनी केली.