लाचेच्या रक्कमेसह हवालदार फरार; रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 18:36 IST2021-03-26T18:36:12+5:302021-03-26T18:36:41+5:30

अट्रॉसिटीच्या अर्जामध्ये मदत करून अर्जदाराला अर्ज मागे घ्यायला लावून गुन्हा दाखल न करण्यासाठी व गंगाखेड रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच

Two employees, including a railway police officer, are trapped by the ACB | लाचेच्या रक्कमेसह हवालदार फरार; रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लाचेच्या रक्कमेसह हवालदार फरार; रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

गंगाखेड (जि. परभणी) : ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मदत करुन अर्जदाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या रेल्वे पोलीसच्या एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध २५ मार्च रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, १ लाख रुपयांची रक्कम स्वीकारुन हवालदार फरार झाला असून, पोलीस शिपायास एसीबीने ताब्यात घेतले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या ४५ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध दाखल झालेल्या अट्रॉसिटीच्या अर्जामध्ये मदत करून अर्जदाराला अर्ज मागे घ्यायला लावून गुन्हा दाखल न करण्यासाठी व गंगाखेड रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन सुरू ठेवण्यासाठी रेल्वेच्या परळी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक माधुरी महादेवराव मुंढे, हवालदार संजय त्र्यंबक भेंडेकर व पोलीस शिपाई प्रेमदास दयाराम पवार यांनी १८ मार्च रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावर असलेल्या पार्किंगमध्ये आणि २० मार्च रोजी परळी येथील रेल्वेच्या पोलीस ठाण्यात पंचासमक्ष १ लाख रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परळी येथे सापळा लावला. तेव्हा लाचेची मागणी करणाऱ्या तिघांपैकी हवालदार संजय त्र्यंबक भेंडेकर यांनी लाचेची एक लाख रुपयांची रक्कम स्विकारून लाचेच्या रकमेसह पळ काढला. यावेळी तेथे असलेल्या पोलीस शिपाई प्रेमदास दयाराम पवार यास एसीबी पथकाने ताब्यात घेऊन गंगाखेड पोलीस ठाण्यात आणले.

याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रेल्वेच्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी महादेवराव मुंढे, हवालदार संजय त्र्यंबक भेंडेकर व पोलीस शिपाई प्रेमदास दयाराम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कार्यवाही एसीबीच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक अमोल कडू, कर्मचारी अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद, सचिन धबडगे, सारिका टेहरे आदींच्या पथकाने केली आहे.

Web Title: Two employees, including a railway police officer, are trapped by the ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.