दोन मृत्यू अन् एक साक्षीदार! सेलूजवळ युवतीनंतर रेल्वेतून पडलेल्या जखमी युवकाचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:38 IST2025-12-17T13:37:15+5:302025-12-17T13:38:27+5:30
काय घडलं होतं त्या प्रवासात? दोन जीव गेले, पण रहस्य कायम

दोन मृत्यू अन् एक साक्षीदार! सेलूजवळ युवतीनंतर रेल्वेतून पडलेल्या जखमी युवकाचाही मृत्यू
सेलू (जि.परभणी) : पुणे-नांदेड एक्स्प्रेसमधून सोमवारी सकाळी साडेसात वाजता ढेंगळी पिपळगाव परिसरात खाली पडून अक्षरा गजानन नेमाडे ही युवती ठार झाली होती. तिच्यासोबत खाली पडलेला राजेंद्र दीपक उमाप (रा.पुसद, जि.यवतमाळ) या युवकाचीही मृत्यूशी झुंजही अपयशी ठरली. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे राजेंद्र उमापची प्राणज्योत मालवली.
नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र उमाप हा सेलू येथे मित्राकडे जातो म्हणून तो पुसदवरून रविवारी सेलूला आला होता. त्यांनी रविवारी रात्री वडिलांना सेलूला आलो याबाबत संपर्क केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे घटनेच्या दिवशी अक्षरा नेमाडे आणि अनुष्का नेमाडे ह्या दोन्ही बहिणीसोबत राजेंद्र उमाप हा पुणे-नांदेड एक्स्प्रेस रेल्वेमधून प्रवास करताना सोमवारी सकाळी ढेंगळी पिपळगाव परिसरात अक्षरा गजानन नेमाडेसह राजेंद्र उमाप हे दोघेही पडले. यात मुलीचा मृत्यू झाला तर पाठोपाठ गंभीर जखमी युवकाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत शवविच्छेदन झाल्यानतर राजेंद्र याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
जवाबानंतर होईल घटनेचा उलगडा
मृत अक्षरा नेमाडे हिच्यासोबत असलेली बहीण अनुष्का नेमाडे हिचा आणि मृत राजेंद्र उमाप याच्या सेलूतील मित्राचा जबाब घेतल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल, अशी माहिती तपास अधिकारी कैलास वाघ यांनी दिली.