मानवत बाजार समिती निवडणुक रद्द; उमेदवाराच्या निधनामुळे निवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 15:31 IST2023-04-23T15:26:37+5:302023-04-23T15:31:14+5:30
निवडणुक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी सुरु असलेली बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.

मानवत बाजार समिती निवडणुक रद्द; उमेदवाराच्या निधनामुळे निवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय
मानवत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारी सेवा संस्था मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचे शुक्रवारी निधन झाल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला. हा पेच प्रसंग निर्माण झाल्याने प्रक्रियेला स्थगिती मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. सरते शेवटी 23 एप्रिल रोजी निवडणुक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी सुरु असलेली बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.
बाजार समितीच्या 18 संचालक पदासाठी एकूण 51 उमेदवार रिंगणात उतरले होते. अर्ज मागे घ्यायची मुदत संपल्यानंतर 21 एप्रिल रोजी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार होते. मात्र तालुक्यातील मंगरूळ येथील उमेदवार रावसाहेब कदम यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात अर्ज दाखल केला होता. मात्र 21 एप्रिल रोजी सकाळी 10:04 वाजता कदम यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.
निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराचे निधन झाल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी वि ज भ ज प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले उमेदवार गणेश नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली. यानंतर निवडणूक प्रक्रियेचे काय होणार, निवडणुकीला स्थगिती मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. 22 एप्रिल रोजी मंगरूळ बू येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून मृत्यू दाखला प्रमाणपत्र आणि अहवाल प्राप्त झाल्या नंतर 23 एप्रिल रोजी निवडणुक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी 28 एप्रिल रोजी बाजार समितीसाठी होणारी मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आले बाबतचे आदेश काढले आहेत