बुधवारी बारा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:55+5:302021-04-08T04:17:55+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण करू लागला आहे. ७ एप्रिल रोजी कोरोनावर उपचार घेणाऱ्या ...

बुधवारी बारा जणांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण करू लागला आहे. ७ एप्रिल रोजी कोरोनावर उपचार घेणाऱ्या १२ रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला असून नवीन ६८४ रुग्णांची नोंद झाली आहे.
तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही त्याच पटीने वाढू लागल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, बाधित रुग्णांची संख्याही तेवढ्याच पटीने वाढत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
बुधवारी दिवसभरात शासकीय रुग्णालयातील ८ आणि खासगी रुग्णालयातील ४ अशा १२ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ४ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे.
आरोग्य विभागाला ३ हजार ५४३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २ हजार ८३६ अहवालांमध्ये ४८७ आणि रॅपिड अँटीजन टेस्टच्या ७०७ अहवालांमध्ये १९७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ हजार ९४० झाली असून, त्यातील १३ हजार ७०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ४७२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या ३ हजार ७६८ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयात ६०, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५०, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ,१९३, अक्षदा मंगल कार्यालयात ९३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे २ हजार ८५० रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू आहेत. ३८६ रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.