दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 13:30 IST2021-07-22T13:25:17+5:302021-07-22T13:30:46+5:30
Dudhna project News : जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते.

दुधना प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडले; मुसळधार पावसाने आवक वाढली
सेलू ( परभणी ) : निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दुपार पासून मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक वेगाने सुरू असून प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. ( Twelve doors of the Dudhna project opened )
जालना जिल्ह्यात पाऊस झाल्यानंतर दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू होते. प्रकल्पात अगोदरच ८४.१३ टक्के पाणी साठा आहे. बुधवारी दुपारी आणि रात्री ही पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असून पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने बुधवारी रात्री ८ वाजता चार तर राञी पुन्हा आठ असे बारा दरवाजे उघडले आहेत. व्दार क्र १,२,३,४,५,६, १५,१६,१७,१८,१९,२० हे ०.३० मीटरने उचलून १२हजार ४९२ क्युसेसने पाण्याचा नदीपाञात विसर्ग केला जात आहे.
मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे राजवाडी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वालूरची वाहतूक बंद आहे. तसेच मोरेगाव येथील पुलावरून काही प्रमाणात पाणी वाहत आहे. सद्यस्थितीत मोरेगाव येथील वाहतूक सुरळीत झाली असलीतरी रात्री वाहतूक बंद झाली होती.