सार्वजनिक सिंचन विहिरीच्या कामांकडे फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:19+5:302021-02-05T06:05:19+5:30
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे सुरू ...

सार्वजनिक सिंचन विहिरीच्या कामांकडे फिरवली पाठ
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे सुरू करण्यात आली आहेत; मात्र वेळेवर मजुरांना मजुरी व बांधकाम केलेले कुशल देयक मिळत नसल्याने या कामाकडे ग्रामपंचायतींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहणार आहे.
पालम तालुक्यात पंचायत समितींतर्गत सार्वजनिक २१ सिंचन विहिरींच्या कामांना मागील वर्षी सुरुवात करण्यात आली होती. कोरोनाचा फैलाव व त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका लागल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. काम करताना मराठवाडा विकास पॅकेज अंतर्गत स्वतंत्र निधी देण्यात येणार होता; परंतु, हा निधी कोरोना आजारावर खर्च झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे विहिरीचे बांधकाम करून दाखल केलेले कुशल देयक मिळताना अडचणी निर्माण होत आहेत. यातच काही ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे; परंतु महिनाभरापासून मजुरांची मजुरी अदा करण्यात आलेली नाही. यामुळे नव्याने काम सुरू करण्याकडे ग्रामपंचायत पाठ फिरवत आहे.